सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

मुंबईमधील मतदान आणि महाराष्ट्र / कामगार दिन यामुळे याही आठवडय़ात बाजाराचे कामकाज तीनच दिवस चालले. प्रत्येक दिवशी मर्यादित पट्टय़ात मार्गक्रमण करीत निर्देशांक दिवसअखेर खालच्या स्तरावर बंद होत होते. आठवडाअखेर मुंबई बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १०४, तर निफ्टी ४२ अंशांची घट दाखवून बंद झाला.

मे महिन्याची सुरुवात काहीशी निराशाजनक बातम्यांनी झाली. एप्रिलअखेर निर्मिती निर्देशांकामधे सलग आठव्या महिन्यात घसरण झाली. एप्रिल महिन्याच्या प्रवासी वाहनांच्या एकूण विक्रीत १७ टक्यांची घट झाली. मारुती-सुझुकीप्रमाणेच मार्चअखेरच्या तिमाहीत मागणीच्या अभावाचा फटका हीरो मोटोकॉर्प, टीव्हीएस मोटर्सलादेखील बसला आहे. त्यामुळे वाहन उद्योगांचे समभाग मंदीमधे आहेत. वाहन उद्योगांतील मंदीचा थेट परिणाम सुटे भाग निर्मात्या कंपन्या, कर्जवाटप करणाऱ्या कंपन्या, धातू उद्योग यावर पडत असतो. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांपैकी ब्रिटानिया, डाबर, नेरोलॅक, गोदरेज, िहदुस्तान युनिलिव्हरसारख्या नित्य-उपभोग्य वस्तूंचे उत्पादन/विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या विक्री व नफ्यातही किरकोळ वाढ झालेली दिसते.

निवडणुकांच्या निकालाबाबत असणारी अनिश्चितता, ग्रामीण भागातील दुष्काळाचे सावट, बेरोजगारीमुळे घटलेली क्रयशक्ती यामुळे मोठे खर्च पुढे ढकलण्याकडे सर्वाचा कल दिसतो आहे. त्यातच बँका व वित्तीय संस्थांकडे असणारा रोकडसुलभतेच्या अभावामुळे सहज कर्ज उपलब्ध होत नसल्याने ग्राहकाभिमुख वस्तूंची बाजारातील मागणी जोर पकडत नाही. एप्रिल महिन्यातील वस्तू-सेवा कराची विक्रमी वसुली व रुपयाच्या विनिमयाचा आटोक्यात असणारा दर या दिलासा देणाऱ्या बाबी असल्या तरी त्या बाजारातील मालाला उठाव आणू शकलेल्या नाहीत. दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमती पिंपामागे ७१ डॉलर्सच्या जवळपास असणे ही अर्थव्यवस्थेला खुपणारी बाब आहे. त्यामुळे बाजारातील बहुतांश कंपन्यांच्या बाजारमूल्य वाढीसाठी सहा महिने तरी वाट पाहावी लागेल. तोपर्यंत पावसाचे आणि केंद्र सरकारचे भवितव्य निश्चित झालेले असेल. त्यामुळे सध्याच्या पातळीवर नवीन खरेदी केल्यास किमान १० टक्के भांडवली वृद्धी होण्यास १८ ते २४ महिने वाट पाहावी लागेल.

येस बँकेच्या नवीन प्रमुखांनी सावध पवित्रा घेत अनुत्पादित कर्जे व आकस्मिक संभाव्य दायित्वासाठी वाढीव तरतुदीमुळे बँकेच्या नफ्यावर परिणाम होऊन वार्षिक प्रति समभाग उत्पन्नात ३० टक्क्याहून अधिक घट झाली आहे. स्टेट बँक व अ‍ॅक्सिस बँकेप्रमाणे याही बँकेच्या ताळेबंदाची स्थिती भविष्यात उज्ज्वल होईल, पण त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. एल अँड टी फायनान्सच्या वार्षिक नफ्यात ७७ टक्क्यांची भरघोस वाढ झाली आहे. तिच्या ग्रामीण व गृहकर्जाच्या व्यवसाय अनुक्रमे ५० व ३४ टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीने आयएलएफएसच्या उपकंपन्यांना तारणयुक्त कर्जे दिली असली तरी खबरदारी म्हणून ८४ कोटींची तरतूद केली आहे. दीर्घकाळ राखून ठेवायच्या समभागांच्या यादीत या उमद्या समभागाचा समावेश करण्यास हरकत नाही.

सद्यस्थितीत बाजाराला दिशा दाखविणाऱ्या घटनेच्या प्रतीक्षेत एक-दोन आठवडे बाजार अशाच दिशाहीन अवस्थेत असेल.