देशात वेगाने सुरू असलेला करोनाचा प्रादुर्भाव हा अर्थव्यवस्थेच्या सुधारास अडसरीचा ठरेल या भीतीने चलन बाजाराने खूप मोठी धास्ती घेतल्याचे दिसून येते. गुरुवारी याचे प्रतिबिंब अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सलग चौथ्या दिवसात सुरू राहिलेल्या घसरणीतून दिसून आले.

आंतर-बँक चलन विनिमयाच्या व्यवहारात रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत ११ पैशांनी घसरून, ते ७४.५८ या पातळीवर गुरुवारी व्यवहार आटोपले तेव्हा स्थिरावले. दिवसाच्या व्यवहारात रुपया ७५ नजीक ७४.९३ पर्यंत गडगडला होता. बुधवारच्या व्यवहारातही रुपयाने मागील २० महिन्यांतील सर्वात मोठी आपटी नोंदविली होती. प्रति डॉलर रुपया १०५ पैशांनी गडगडला आणि त्याचे प्रति डॉलर मूल्य ७४.४७ झाले होते. रुपयाच्या मूल्यात एका दिवसाच्या व्यवहारात झालेली ५ ऑगस्ट २०१९ नंतरची सर्वात वाईट घसरण होती.

रुपयाच्या मूल्यात सलग चार दिवसांपासून घसरण सुरू असून, या चार दिवसांमध्ये त्याचे मूल्य १४६ पैशांनी घटले आहे. उल्लेखनीय म्हणजे चालू महिन्यांतील रुपया हे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सर्वात वाईट कामगिरी असणारे आशियाई देशातील चलन ठरले आहे. एकीकडे विक्रमी गतीने वाढती रुग्णसंख्या आणि दुसरीकडे लशींच्या तुटवड्यामुळे थंडावण्याची शक्यता असलेले लसीकरण या प्रतिकूल घटनांवर प्रतिक्रिया म्हणून रुपयाचे मूल्य आणखी डगमगण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

एकूण जगभरात करोना आजारसाथीची नव्याने लाट उसळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेची फेरउभारी धोक्यात येण्याबरोबरच, एकूण अर्थचक्राबाबत अनिश्चितता निर्माण होते, असे रेलिगेअर ब्रोकिंगच्या चलन संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा सुगंधा सचदेव म्हणाल्या. देशांतर्गत व्यापार-उदीम यातून प्रभावित होण्याबरोबरच, परराष्ट्र आयात-निर्यात व्यापारातही मोठी बाधा येण्याच्या शक्यतेने चलनाच्या मूल्यावर ताण आणला असल्याचे त्या म्हणाल्या.

एकूण जगभरात करोना आजारसाथीची नव्याने लाट उसळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेची फेरउभारी धोक्यात येण्याबरोबरच, एकूण अर्थचक्राबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. याचा चलनाच्या मूल्यावर ताण येणे स्वाभाविक आहे.

– सुगंधा सचदेव, रेलिगेअर ब्रोकिंग