शेअर बाजारातील तेजीचा उत्सव आणि विदेशी वित्तसंस्थांचा खरेदीमय उत्साह या परिणामी चलन बाजारात रुपयाला चांगलाच आधार मिळाला असून, बुधवारी प्रति डॉलर आणखी आठ पैशांनी उसळी घेत रुपयाने दोन सप्ताहातील उच्चांकी ६१.२३ ही पातळी पुन्हा ग्रहण केली. रिझव्‍‌र्ह बँकेने दुसऱ्या तिमाही पतधोरण आढाव्यातून रेपो दर वाढीचा निर्णय घेतला असला तरी पुढे काही काळ तरी दर वाढ नाही आणि अर्थव्यवस्थेवरील तिचा परिणाम पाहूनच पुढचा निर्णय होईल, या बुधवारी विश्लेषकांशी संवाद साधताना गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी केलेल्या विधानाने चलन बाजारात अखेरच्या टप्प्यावर रुपयाला आणखीच बळ मिळवून दिले. त्या आधी महिनाअखेर असल्याने आयातदारांकडून वाढलेली मागणी पाहता, व्यवहाराच्या मध्यान्हाला रुपयाने डॉलरमागे ६१.६० पातळीपर्यंत लोळण घेतली होती.