कृषी, पर्यटन, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात संधी

मुंबईइतकी लोकसंख्या आणि भारताच्या समकक्ष विकास दर असलेल्या आफ्रिकेतील रवांडा देशाने भारताबरोबरचे व्यापारी संबंध विस्तारण्याच्या दृष्टीने उभय देशांची प्रमुख राजधानी थेट हवाई सेवेने जोडली आहे. भारत आणि रवांडा देशातील सध्याचा २० कोटी डॉलरचा व्यापार येत्या कालावधीत पाच पटीने विस्तारेल, असा विश्वासही यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे.

आफ्रिकेतील रवांडा देशातील एकमेव सार्वजनिक हवाई प्रवासी वाहतूक सेवा कंपनी असलेल्या रवांड एअरची रवांडाची राजधानी किगाली ते भारताची आर्थिक राजधानी मुंबई अशी थेट विनाथांबा हवाई प्रवासी वाहतूक सेवा मंगळवारपासून सुरू झाली. किगाली हे आफ्रिकेच्या मध्यभागी असलेले शहर आहे.

यानिमित्ताने रवांडाचे उच्चायुक्त अर्नस्ट वामुक्यो यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१५ मध्ये आफ्रिकेत येऊन गेल्यानंतर उभय देशातील सामंजस्य अधिक वेग घेत आहे. रवांडा देशही भारताबरोबर व्यापारवृद्धीसाठी उत्सुक असून येत्या काही कालावधीत दोन देशांतील व्यापार सध्याच्या २० कोटी डॉलरवरून तिप्पट होईल.

भारताचे २०२० पर्यंत आफ्रिकेबरोबर १०.७ अब्ज डॉलरचे सहकार्य राहणार असून रवांडा आणि भारतादरम्यान कृषी, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, पायाभूत सेवा, स्थावर मालमत्ता, शिक्षण, आरोग्य क्षेत्रात कार्य करण्याची संधी असल्याचेही वामुक्यो म्हणाले. रवांडा विकास मंडळाद्वारे रवांडातही भारतीय व्यावसायिकांसाठी सुलभ व्यवसाय वातावरण निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीयांना रवांडामध्ये कृषी, पर्यटन, निर्मिती उद्योगसारख्या क्षेत्रात संधी असल्याचे स्पष्ट करत वामुक्यो यांनी भारतात आम्ही माहिती तंत्रज्ञान, आरोग्यनिगा, शिक्षण आदी क्षेत्रांतील वाटचालवृद्धी पाहत असल्याचे वामुक्यो यांनी सांगितले. भारतात वैद्यकीय पर्यटन, शिक्षण क्षेत्राकडे रवांडावासीयांचा विशेष कल असल्याचे ते म्हणाले.

रवांड एअरचे मुंबईमार्गाद्वारे आशियात पाऊल

मुंबई: आफ्रिकेतील रवांडा देशातील सार्वजनिक हवाई प्रवासी वाहतूक कंपनी असलेल्या रवांड एअरने किगाली ते मुंबई अशी थेट विनाथांबा सेवा सुरू करून आशिया भागात प्रवेश केला आहे. एरवी युरोपमधून उपलब्ध असलेल्या या मार्गामुळे आता वेळ व पैशाची निम्म्यापर्यंत बचत होणार आहे. भारतातील नवी दिल्ली, बंगळूरु शहरांसह चीनमधील अनेक शहरांना भविष्यात जोडून रवांड एअरसाठी भारत हे आशियाचे प्रवेशद्वार व्यवसायाकरिता निश्चित करण्यात येत असल्याचे रवांड एअरच्या जागतिक विक्री विभागाचे संचालक अलेक्स बुटेरे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. आंतरराष्ट्रीय विस्ताराकरिता रवांडाकरिता भारत ही महत्त्वाची बाजारपेठ असल्याचेही ते म्हणाले.

रवांड एअर आफ्रिकेतील १९ शहरांमध्ये सध्या देशांतर्गत हवाई वाहतूक प्रवासी सुविधा देते. देशांतर्गत हवाई वाहतूक बाजारपेठेत रवांड एअरचा ८० टक्के हिस्सा आहे. रवांडातील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळाची सध्या ३५ लाख वार्षिक प्रवासी हाताळणी आहे. दुसरे नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ २०१९ पर्यंत तयार झाल्यानंतर हे प्रमाण येत्या दशकभरात एक ते दीड कोटी प्रवासी होणार आहे.

रवांड एअर नवी आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी वाहतूक सेवा येत्या काही दिवसांत हरारे (झिम्बाब्वे) व लंडन (ब्रिटन) येथे सुरू करणार आहे. तर चीनमधील क्वान्झोऊ आणि अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्येही येत्या काही महिन्यांमध्ये कंपनीची आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी वाहतूक सेवा सुरू होईल. येत्या वर्षभरात नवीन आठ आंतरराष्ट्रीय मार्ग आफ्रिकेशी कंपनीच्या माध्यमातून जोडले जातील.