‘सेबी’द्वारे निश्चित १९०० कोटी राखीव किंमतीला लागेल बोली
ऑनलाइन लिलाव प्रक्रियेद्वारे सहाराच्या आणखी काही मालमत्तांचा लिलाव येत्या महिन्यात होऊ घातला आहे. नव्या १६ ठिकाणच्या मालमत्तांवर बोलीसाठी ‘सेबी’कडून १,९०० कोटीर रुपयांची राखीव किंमत निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वीच्या पाच मालमत्तांसाठी निर्धारीत केलेली १,२०० कोटींची किंमत मिळून आता एकूण ३,१०० कोटी रुपये वसुल करण्याची सेबीने तयारी केली आहे.
गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठीच्या प्रक्रियेचा भाग म्हणून सहाराच्या मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. सहारा समूहाविरुद्ध लाखो गुंतवणूकदारांची कोटय़वधींची रक्कम परत मिळविण्यासाठी कायदेशीर लढाई उभी करणाऱ्या सेबीला मालमत्ता विक्री प्रक्रियेसाठी पुढाकार घेण्यास सांगण्यात आले होते.
दुसऱ्या टप्प्यात एसबीआय कॅपिटलद्वारे १३ जुलै रोजी १,१९६ कोटींच्या राखीव किमतीसह तर १५ जुलै रोजी एचडीएफसी रिएल्टी ७०२ कोटी रुपयांच्या राखीव किमतीसह प्रत्येकी आठ मालमत्तांचा ई-लिलाव करेल.
१,२०० कोटी रुपये राखीव किंमत असलेल्या सहाराच्या मालकीच्या १० मालमत्तांची लिलाव प्रक्रिया गेल्याच आठवडय़ात जाहीर करण्यात आली होती. एचडीएफसी रिएल्टी व एसबीआय कॅपिटल यांच्या माध्यमातून ४ व ७ जुलै रोजी होणाऱ्या १० मालमत्तांच्या ई-लिलावाकरिता १,२०० कोटी रुपये राखीव किंमत निश्चित करण्यात आली आहे. एचडीएफसी रिएल्टी व एसबीआय कॅपिटलमार्फत ही प्रक्रिया सकाळी १०.३० ते ११.३० दरम्यान होणार आहे. पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यांतील मालमत्तांचा समावेश आहे.
सहाराचे प्रमुख सुब्रता रॉय हे दोन वर्षांच्या दिल्लीतील तिहार तुरुंगानंतर नुकतेच दोन महिन्यांसाठीच्या पॅरोलवर सुटले आहेत. सहाराचे सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाने १०,००० कोटी रुपये जमा करण्यास सांगितले आहेत.