आघाडीचे फंड घराणे असलेल्या एसबीआय म्युच्युअल फंडाने आपली पहिलीवहिली स्थिर उत्पन्न पर्यायातील ईटीएफ योजना ‘एसबीआय-ईटीएफ १० इयर गिल्ट’ या नावाने २ जूनपासून विक्रीस दाखल केली आहे. अत्यंत अल्पखर्चिक असण्यासह, रोकड सुलभता, पोर्टफोलिओत विविधता आणि पारदर्शी स्वरूपाचे गुंतवणूक धोरण असणारी ही मुदत-मुक्त (ओपन एंडेड) एक्सचेंज ट्रेडेड – ईटीएफ योजना आहे.
दहा वर्षे मुदतीच्या सरकारी रोख्यांचा निफ्टी जी-सेक निर्देशांक मानदंड असणाऱ्या या योजनेतून कमाल ९५ टक्क्य़ांपर्यंत गुंतवणूक त्या निर्देशांकात सामील मध्यम ते उच्च जोखमीच्या रोख्यांमध्ये केली जाईल. उर्वरित ५ टक्के गुंतवणूक अत्यल्प जोखीम असणाऱ्या सीबीएलओसह मनी मार्केट साधनांमध्ये केली जाईल. व्याजाच्या दरात होणाऱ्या बदलांचा कर्जरोखे तसेच समभागांच्या किमतीवरही परिणाम होत असतो. जर व्याज दर वाढले, तर रोख्यांच्या किमती गडगडतात आणि तर त्या उलट समभागांचे वर्तन असते. व्याजाचे दर वाढण्याचे समभागांवरही नकारात्मक परिणाम शक्य आहेत. त्यामुळे अशा व्याज दर जोखमीच्या स्थितीत वैविध्यपूर्ण पोर्टफोलियो असणे जरुरीचेच ठरते. ईटीएफ योजनेतून हेच साध्य केले जाईल, असे एसबीआय म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी नवनीत मुनोत यांनी सांगितले. योजनेची प्रारंभिक विक्री ८ जून २०१६ पर्यंत सुरू राहील. या कालावधीत अर्ज दाखल करण्याची किमान रक्कम ५००० रुपये असेल. ‘एनएसई’वरील सूचिबद्धतेनंतर, २२ जून २०१६ पासून योजनेच्या युनिट्समध्ये नियमित व्यवहार सुरू होतील. योजनेवर प्रवेश अथवा निर्गमन भार लागू नाही.