ग्राहकही ३.५० कोटींनी रोडावले; २५,००० कोटींची हक्कभाग विक्री

मुंबई : विलीनीकरणाच्या माध्यमातून देशात सर्वाधिक ग्राहकसंख्या राखणारी कंपनी म्हणून उदयास आलेल्या व्होडाफोन-आयडियाला डिसेंबर २०१८ अखेरच्या तिमाहीत मोठय़ा तोटय़ाला सामोरे जावे लागले आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत ५,००४.६० कोटी रुपयांचा तोटा नोंदविला आहे.

महसुलातील घसरणीसह कंपनीची ग्राहकसंख्याही यंदा रोडावली आहे. कंपनीने ११,७६४.८० कोटींसह २.२ टक्के महसूल घसरण गेल्या तिमाहीत नोंदविली आहे. तर या कालावधीत ३.५० कोटींनी कंपनीचे ग्राहक कमी झाले आहेत.

आर्थिक पाठबळासाठी कंपनीने २५,००० कोटी रुपयांची हक्कभाग विक्री करण्याचे निश्चित केले आहे. याबाबत कंपनीच्या संचालक मंडळाने बुधवारी मंजुरी दिली. भांडवली बाजार व्यवहारानंतर कंपनीने वित्तीय निष्कर्ष जाहीर केले.

व्होडाफोन-आयडियाच्या विलीनीकरणाने १० अब्ज डॉलरच्या मालमत्तेच्या निर्मितीबरोबरच कंपनीने ग्राहकसंख्येत अव्वल असलेल्या भारती एअरटेलला मागे टाकत रिलायन्स जिओला टक्कर देण्याचा प्रयत्न केला.

व्होडाफोन-आयडियाचा प्रति ग्राहक महसूल ऑक्टोबर ते डिसेंबर २०१८ दरम्यान नाममात्र वाढत ८९ रुपये झाला आहे. तुलनेत सध्या भारती एअरटेल (१०४ रुपये) व रिलायन्स जिओ (१३० रुपये) चे प्रत्येक ग्राहकामागील महसुली उत्पन्न अधिक आहे.

रिलायन्स जिओने डिसेंबरअखेरच्या तिमाहीच्या रूपात सलग पाचव्या तिमाहीत नफ्यातील वाढ नोंदविली आहे. तर भारती एअरटेलने गेल्या तिमाहीत वार्षिक तुलनेत नफ्यातील घसरण नोंदविली. त्याचबरोबर भारती एअरटेलच्या ग्राहकांची संख्याही ५.८० कोटींनी कमी झाली.