मंगळवारच्या नफेखोरीने भांडवली बाजार पुन्हा एकदा वाढीचा प्रवास करता झाला. वस्तू व सेवा कर विधेयकावरून केंद्र व राज्यांमधील तिढा सुटण्याची चाहूल बाजाराने सकारात्मक घेतली. ४७.८१ अंश वाढीने सेन्सेक्सला त्याचा २८ हजारांवरील स्तर पुन्हा एकदा गाठता आला. मुंबई निर्देशांक २८,०२४.३३ वर पोहोचला. तर २५.१५ अंश वाढीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,६१५.८० पर्यंत स्थिरावला.
भांडवली बाजारात गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीचे अखेरचे व्यवहार होणार आहेत. जपानच्या मध्यवर्ती बँकेचे अर्थसाहाय्य निर्णयाचे पडसाद या वेळी उमटण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या पतधोरण निर्णयाचीही बाजाराला चालू आठवडय़ात प्रतीक्षा राहणार आहे.
तिमाही नफ्यातील २६.८६ टक्के वाढीने सेन्सेक्समधील एचडीएफसी लिमिटेड १.४८ टक्क्य़ांनी वाढला, तर जूनअखेरच्या तिमाही नफ्यात ८० टक्के घसरणीतून डॉ. रेड्डीज्चा समभाग अद्यापही सावरलेला नाही. सलग दुसऱ्या सत्रात कंपनी समभाग मूल्य १० टक्क्य़ांहून अधिक प्रमाणात कमी झाले.
सेन्सेक्समधील १७ कंपनी समभागांनी मूल्यवाढ नोंदविली. यामध्ये आयसीआयसीआय बँक, अदानी पोर्ट्स, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ल्युपिन, टीसीएस, सन फार्मा, स्टेट बँक, भारती एअरटेल हे ३ टक्क्य़ांपर्यंतच्या वाढीने आघाडीवर राहिले. दूरसंचार, बँक, पोलाद, वाहन, भांडवली वस्तू, आरोग्यनिगा, ऊर्जा, ग्राहकपयोगी वस्तू निर्देशांक १.२६ टक्क्य़ांची वाढ नोंदविणारे ठरले. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक ०.६० टक्क्य़ांपर्यंत वाढले.