मुंबई : भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक सप्ताहअखेर पुन्हा एकदा नव्या विक्रमावर स्वार झाले. जागतिक भांडवली बाजारातील तेजीच्या जोरावर येथील गुंतवणूकदारांनी विशेषत: माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्माण कंपन्यांच्या समभागांची सपाटून खरेदी केल्याने सेन्सेक्स व निफ्टी ऐतिहासिक टप्प्यावर विराजमान होऊ शकले.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी १७४.२९ अंश वाढीसह ५२,४७४.७६ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६१.६० अंश वाढीमुळे १५,७९९.३५ पर्यंत स्थिरावला. आठवडय़ात तीन व्यवहारांत निर्देशांकांनी दिवसाआड नव्या विक्रमाची नोंद केली.

सेन्सेक्स तसेच निफ्टीची सप्ताह कामगिरीही चमकदार राहिली. या दरम्यान मुंबई निर्देशांक ३७४.७१ अंशांनी तर राष्ट्रीय निर्देशांक १२९.१० अंशांनी उंचावला आहे. सप्ताहअखेरच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्स ५२,६४१.५३ पर्यंत झेपावला होता. दोन्ही निर्देशांक आता त्यांच्या अनुक्रमे ५२,५०० व १५,८०० नजीक आहेत.

सेन्सेक्समधील प्रमुख ३० पैकी डॉ. रेड्डीज् सर्वाधिक, ३ टक्क्य़ांहून अधिक वाढला. तसेच पॉवरग्रिड, टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक, रिलायन्स इंडस्ट्रिज, टेक महिंद्रही वाढले. तर लार्सन अ‍ॅँड टुब्रो, इंडसइंड बँक, बजाज फिनसव्‍‌र्ह, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, आयटीसी आदी मात्र एक टक्क्य़ापर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, आरोग्यनिगा निर्देशांक ३ टक्क्य़ांपर्यंत वाढले. तर स्थावर मालमत्ता, भांडवली वस्तू, बँक, दूरसंचार, ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांकांना तेजीच्या बाजारातही घसरणफटका बसला. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक प्रत्येकी जवळपास अध्र्या टक्क्य़ापर्यंत वाढले.

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे आकडे तसेच युरोपीय मध्यवर्ती बँकेचे पतधोरण यासारख्या घडामोडींबरोबर देशांर्तगत हालचालींची प्रतिक्रिया भांडवली बाजारात नव्या सप्ताहात उमटेल.

ऐतिहासिक बाजार भांडवल

देशातील सर्वात जुन्या मुंबई शेअर बाजाराचे बाजार भांडवलही सप्ताहअखेर सर्वोच्च टप्प्यावर पोहोचले. बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण मूल्य २३१.११ लाख कोटी रुपयांपर्यंत स्थिरावले. गेल्या दोन व्यवहारात बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्ती ३.२६ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. शुक्रवारच्या सत्रात सेन्सेक्सची मजल गुरुवारच्या तुलनेत ३४१ अंश अधिक होती. मुंबई शेअर बाजाराचे बाजार भांडवली २४ मे २०२१ ला प्रथमच ३ लाख कोटी डॉलपर्यंत पोहोचले होते.

तळातून निर्देशांक तेजीवेग

भारतात करोना प्रसारामुळे घोषित टाळेबंदीवर प्रतिक्रिया देताना सेन्सेक्स ३५ हजाराखाली आला होता. त्याने आता ५० हजाराच्याही पुढे मजल मारली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक १९८६ मध्ये अस्तित्वात आला. २५ जुलै १९९० मध्ये तो प्रथमच १,००० पर्यंत पोहोचला. तर १०,००० चा टप्पा गाठण्यास त्याला १६ वर्षे लागली. ७ फेब्रुवारी २००६ मध्ये या स्तरावर होता. चालू वर्षांत सेन्सेक्सचा प्रवास ५० हजारांपासून सुरू झाला.

२०२१ मधील सेन्सेक्स कल :

२१ जानेवारी :सत्रात ५० हजाराला स्पर्श

३ फेब्रुवारी :व्यवहारअखेर ५० हजारावर बंद

५ फेब्रुवारी : ५१ हजाराचा स्तर अनुभव

८ फेब्रुवारी :५१ हजारापुढे स्थैर्य

१५ फेब्रुवारी : ५२ हजाराला गवसणी

सेन्सेक्सच्या घोडदौडीचे नेतृत्व रिलायन्सकडेच

सेन्सेक्समधल्या घोडदौडीचे नेतृत्व अजूनही रिलायन्सकडेच आहे. कंपनीच्या समभाग मूल्यात शुक्रवारी १.४० टक्क्य़ांपर्यंत वाढ झाली असली तरी त्याचे प्रति समभाग २,३०० पुढील सर्वोच्च वार्षिक मूल्य तूर्त दूर आहे.  – यश गुप्ता, इक्विटी रिसर्च असोसिएट, एंजेल ब्रोकिंग लिमिटेड.