सप्ताहारंभीच्या तब्बल ६ टक्के निर्देशांक आपटीने मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची मालमत्ता एकाच व्यवहारात थेट ७ लाख कोटी रुपयांनी कमी झाली. बाजारात कार्यरत ४,००० कंपन्यांच्या समभागांमध्ये सोमवारी अंदाजे २.७ लाख कोटी गुंतवणूकदारांनी व्यवहार केले. बाजारातील एकूण मालमत्ता २००९ मध्ये निम्मी – ५० लाख कोटी तर २००३ मध्ये १० लाख कोटी रुपये होती. मुंबई शेअर बाजारातील एकूण गुंतवणुकीचा १०० लाख कोटी रुपयांचा स्तरही यामुळे सुटला. दिवसअखेर ही मत्ता ९५,२८,५३६ कोटी रुपयांवर आली. गेल्या सप्ताहात शुक्रवारी बाजार बंद होताना सूचिबद्ध कंपन्यांची एकूण मालमत्ता १०२.३३ लाख कोटी रुपये होती. १०० लाख कोटी रुपयांचा टप्पा देशातील सर्वात जुन्या बाजाराने २८ नोव्हेंबर २०१४ मध्ये पाहिला होता.
आघाडीच्या २० कंपन्यांचे नुकसान ५ लाख कोटी रुपयांचे राहिले. सूचिबद्ध कंपन्यांमध्ये ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक प्रवर्तकांचा हिस्सा असलेल्यांची गुंतवणूक ४ लाख कोटी रुपयांनी कमी झाली.  विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या १.५० लाख कोटी रुपयांच्या मत्तेची रया गेली. किरकोळ गुंतवणूकदारांच्या नुकसानीचा आकडा ७५,००० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते; तर संस्थागत गुंतवणूकदारांना एक लाख कोटी रुपयांचा फटका बसला.