भांडवली बाजाराचा घसरणीचा प्रवास सलग पाचव्या सत्रातही कायम राहिला. रिझव्‍‌र्ह बँकेनंतर अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हकडे नजरा लावून बसलेल्या गुंतवणूकदारांनी गुरुवारी महिन्यातील सौदापूर्तीच्या दिवशी सेन्सेक्सला आणखी दीडशे अंशांनी खेचत २०,५०० च्याही खाली आणून ठेवले. तर डॉलरच्या समोर रुपया १५ पैशांनी कमकुवत होत ६२.५६ पर्यंत घसरला. आर्थिक मंदीतील अमेरिकन अर्थव्यवस्था सावरत असल्याचे पाहून फेडरल रिझव्‍‌र्हने द्रवतापूरक रोखे खरेदी आखडती घेण्याचा अपेक्षित निर्णय बुधवारी अखेर घेतलाच. जानेवारी २०१४ पासून १० अब्ज डॉलरने कमी करण्यात आलेली रोखे खरेदी आता आणखी त्याच प्रमाणात कमी करून ती फेब्रुवारी २०१४ पासून ६५ अब्ज डॉलरवर आणली जाणार आहे. शतकभर जुन्या मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदावरून बाजूला होताना बेन बर्नान्के यांच्या या निर्णयाचे जागतिक महासत्ता अमेरिकेसह भारतासारख्या उभरत्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांवर काय पडसाद उमटतात हे फेडच्या पहिल्या महिलाध्यक्षाच्या कारकिर्दीत पहायला मिळेल.  तथापि या निर्णयाचे ताबडतोबीचे पडसाद म्हणून व्यवहारात तब्बल ३०० अंशांची आपटी मुंबई शेअर निर्देशांकाने गुरुवारी दाखविली. ही घसरण दिवसअखेरीस निम्म्याने सावरली असली तरी पाच दिवसांपूर्वी २१,३७३.६६ या सर्वोच्च स्थानावर असणारा प्रमुख निर्देशांक भारत-अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकांविषयक चिंतेने तब्बल ८७५ अंशांने रोडावला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी गुरुवारअखेर ४६.५५ अंश आपटीने ६ हजारांच्या काठावर, ६,०७३.७० पर्यंत आला आहे. तर एस अ‍ॅण्ड पी बीएसई सेन्सेक्स आता दोन महिन्यांच्या तळसीमेवर आहे. बँक क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक, अ‍ॅक्सिस बँक यांच्यासह सेसा स्टरलाइट, हिंदाल्को, टाटा स्टील या पोलाद कंपन्यांनीही नुकसान सोसले. केवळ वाहन व ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांकच तेजीत राहिले.
रुपयाही गडगडला
ल्ल भांडवली बाजारातील घसरणीचा प्रवास पाहता,  चलन व्यवहारात दोन दिवसांच्या तेजीनंतर गुरुवारी प्रथमच रुपयामध्ये घट नोंदली गेली. डॉलरच्या समोर रुपया १५ पैशांनी कमकुवत होत ६२.५६ पर्यंत घसरला. अमेरिकी फेडच्या निर्णयाने देशात डॉलरचा मायदेशी ओघ वाढल्याचे दिसून आले. त्यातच महिनाअखेर असल्याने तेल आयातदारांच्या वाढलेल्या डॉलरच्या मागणीने रुपया ६२.९१ पर्यंत घरंगळत गेला. गेल्या दोन व्यवहारांत रुपयाने डॉलरमागे १०९ पैशांची मुसंडी मारली होती.

उपाययोजनांसह सज्जतेची सरकारकडून ग्वाही  
अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेसाठी उपाययोजना करणार : अर्थ मंत्रालय
अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या रोखे खरेदी आखडती घेण्याच्या निर्णयाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होणार नाही, असा दावा केंद्रीय अर्थ खात्याने केला. आणखी १० अब्ज डॉलरने कमी रोखे खरेदी करण्याचे पाऊल अमेरिकन मध्यवर्ती बँकेकडून उचलले जाताच मंत्रालयाने तातडीने पत्रक काढून देशाच्या स्थिर अर्थव्यवस्थेसाठी रिझव्‍‌र्ह बँकेसह उपाययोजना जातील, असेही स्पष्ट केले. अमेरिकेच्या निर्णयाचा भारतावर फार काही नकारात्मक परिणाम होणार नाही, असे नमूद करतानाच तसे काही झाल्यास योग्य निर्णय घेण्यास केंद्र सरकार व रिझव्‍‌र्ह बँक समर्थ आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले. फेडरल रिझव्‍‌र्हचा निर्णय अपेक्षित असाच होता; त्यामुळे आश्चर्य तसेच चिंताजनक काहीही नसून भारतीय अर्थव्यवस्था ते फार गंभीर घेईल, असे काहीच नाही, असेही खात्याच्या या पत्रकात म्हटले आहे. महिन्याला ताजी ६५ अब्ज डॉलर रोखे खरेदी हीदेखील कमी रक्कम नसून जागतिक अर्थव्यवस्थेतील मोठय़ा प्रमाणातील निधी गुंतवणूक कायम आहे, हे विसरता कामा नये, असेही केंद्रीय अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.