भक्कम होत असलेल्या अमेरिकी डॉलरचा लाभ लक्षात घेत गुंतवणूकदारांनी औषधनिर्माण, माहिती तंत्रज्ञानसारख्या कंपन्यांकडे कल दाखविल्याने मुंबई शेअर बाजारात बुधवारी शतकी अंशवाढ नोंदली गेली. परिणामी सेन्सेक्स २८ हजारांनजीक पोहोचण्यात यशस्वी ठरला.
१००.१० अंश वाढीने २७,९३१.६४ पर्यंत मजल मारताना मुंबई निर्देशांकाने गेल्या दोन व्यवहारांतील घसरणही थोपवून धरली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत सत्रअखेर २८.६० अंश वाढ होऊन निर्देशांक ८,४९५.१५ वर पोहोचला. यामुळे देशातील सर्वात मोठा बाजार पुन्हा एकदा त्याच्या ८,५०० नजीक पोहोचला आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयाचा गेल्या काही सत्रांपासून घसरणीचा प्रवास बुधवारच्या सुरुवातीच्या व्यवहारातच ६५.४४ या गेल्या दोन वर्षांच्या तळात पोहोचला. दिवसअखेर त्यात मंगळवारच्या तुलनेत ४ पैशांची भर पडली असली तरी भांडवली बाजारात मात्र दिवसभर त्याचे सावट दिसले. भक्कम होत असलेल्या डॉलरमुळे लाभदायी अशा औषधनिर्माण तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांकरिता गुंतवणूकदारांनी मागणी नोंदविली.
सेन्सेक्सनेही सत्रात २८ हजारांचा पल्ला गाठत व्यवहारातील २८,०२१.३९ पर्यंत मजल मारली. मुंबई निर्देशांक गेल्या दोन व्यवहारांत २३५.७७ अंशांनी घसरला होता. तर बुधवारच्या व्यवहारात निफ्टी ८,५२०.४५ पर्यंत झेपावला. मुंबईबरोबरच राष्ट्रीय शेअर बाजारही त्याच्या अनोख्या टप्प्यावर मात्र स्थिर राहू शकले नाहीत.
मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकही पाव टक्क्यापर्यंत वाढले.
सार्वजनिक बँकांना मिळणाऱ्या सरकारी भांडवलामुळे सूचिबद्ध बँका तसेच खनिज तेलाच्या कमी होत असलेल्या दरांमुळे सार्वजनिक तेल व वायू विपणन कंपन्यांना अधिक मागणी राहिली. व्याजदराशी निगडित काही समभागांनाही अधिक भाव मिळाला.

आरोग्यनिगा निर्देशांकाचे बळ
सेन्सेक्समध्ये सन फार्मा, सिप्ला, ल्युपिन, डॉ. रेड्डीज् या औषध निर्माण कंपन्यांचे समभाग ४.३२ टक्क्यांपर्यंत वाढले. आरोग्यनिगा निर्देशांक २.६३ टक्क्यांसह सर्वात आघाडीवर राहिला. सेन्सेक्सच्या वाढीला या निर्देशांकात सामील कंपन्यांनीच बळ दिले.

दोन वर्षांपूर्वीचा तळ गाठून रुपया सावरला
मुंबई : चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत गेल्या काही सत्रांपासून सातत्याने घसरणाऱ्या रुपयाने बुधवारच्या व्यवहारात ६५.४४ पर्यंत घसरण नोंदवीत दोन वर्षांपूर्वीच्या तळाला फेर धरला. दिवसअखेर चलन मंगळवारच्या तुलनेत ४ पैशांनी वाढत ६५.२७ पर्यंत पोहोचले असले तरी दिवसभर चलनाच्या गटांगळीने चिंतेचे सावट कायम होते. मंगळवारच्या बंद व्यवहारानंतर बुधवारी सुरुवातीलाच रुपया ६५.४० पर्यंत घसरला. याच दरम्यान त्याने ६५.४४ हा गेल्या दोन वर्षांचा नवा तळही राखला. सत्रात चलन ६५.११ पर्यंत उंचावले. सोमवारी ३१ पैशांनी घसरणारा रुपया सप्टेंबर २०१३ नंतरच्या किमान स्तरावर आला होता.