सेन्सेक्सची ४ हजार अंशांनी झेप; निफ्टीत १० टक्के वाढ

मुंबई : कंपनी कर ते ‘एंजल टॅक्स’ निर्णयातील मोठे बदल; बँकेतर वित्तीय कंपन्यांवर संकट, मंदीचा फटका बसलेल्या स्थावर मालमत्ता, वाहन क्षेत्राची अस्वस्थ मूल्यहालचाल अशा घडामोडींची दखल घेणाऱ्या संवत्सरात सेन्सेक्सने दुहेरी अंकात वाढ नोंदवली आहे.

मावळत्या २०७५ संवत्सरात मुंबई निर्देशांक – ‘सेन्सेक्स’ने ११.६ टक्के म्हणजेच ४,०६६.१५ अंश झेप घेतली आहे. मावळत्या संवत्सरात राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक १,०५३.९० अंश म्हणजे १० टक्क्यांनी उंचावला आहे.

संवत्सर २०७५ च्या अखेरच्या सत्र वर्षभराप्रमाणे, भांडवली बाजाराने मोठी अस्वस्थता दर्शविणारेच ठरले. सप्ताहअखेरच्या व्यवहारात ५२३ अंश झेप घेतल्यानंतर गुरुवारच्या तुलनेत सेन्सेक्स ३७.६७ अंशांनी वाढत ३९,०५८.०६ पर्यंत पोहोचला. तर निफ्टीही किरकोळ वाढीसह ११,६०० च्या वेशीवर स्थिरावला.

चालू सप्ताहात मुंबई निर्देशांक २४०.३२ अंशांनी खाली आला आहे. निफ्टी या दरम्यान ७७.९५ अंशांनी घसरला आहे. शुक्रवारी बँक तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांची खरेदी झाली. सेन्सेक्समध्ये येस बँक तेजीसह अग्रणी राहिला. तर तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या जोरावर स्टेट बँक ७ टक्क्यांहून अधिक वाढला.

मौल्यवान धातू समभाग घसरणीला

प्रमुख निर्देशांकांच्या किरकोळ वाढीच्या वातावरणात भांडवली बाजारातील सूचिबद्ध मौल्यवान धातू विक्री दालन साखळी चालविणाऱ्या कंपन्यांच्या समभागांवर मात्र गुंतवणूकदारांकडून विक्री दबाव राहिला. दागिने कंपन्यांचे समभाग सप्ताह, संवतअखेरीस ६ टक्क्यांपर्यंत घसरले. शुक्रवारी दिवाळीचा पहिला दिवस, धनत्रयोदशी असूनही भांडवली बाजारात मात्र मौल्यवान धातू समभागांमध्ये मूल्यवाढीची चकाकी दिसली नाही.

रविवारी मुहूर्ताचे सौदे

नवीन २०७६ संवत्सराचा प्रारंभ रविवारी होत आहे. एरवी रविवारी भांडवली बाजारात व्यवहार होत नाही. मात्र लक्ष्मीपूजनाच्या संध्येला नव्या संवत्सराच्या पहिल्या सत्राचे व्यवहार होणार आहेत. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात सायंकाळी ६.१५ ते ७.१५ दरम्यान मुहूर्ताच्या सौद्यासाठी व्यवहार होतील.