सेन्सेक्स ३५ हजारांवर; निफ्टी प्रथमच १०,८०० नजीक

तिजोरीवर भार ठरणाऱ्या अतिरिक्त कर्ज उभारणीला सरकारने लावलेल्या कात्रीने भांडवली बाजाराला बुधवारी उत्साहाचे भरते आले. देशातील दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी यामुळे त्यांच्या अनोख्या टप्प्याला गवसणी घातली. असे करताना सेन्सेक्स प्रथमच ३५ हजारांपुढे गेला, तर निफ्टीने इतिहासात प्रथमच त्याच्या १०,८०० नजीकच्या टप्प्याला गवसणी घातली.

केंद्र सरकारने अतिरिक्त कर्ज उभारणीसाठीची आधीची ५०,००० कोटी रुपयांची रक्कम बुधवारी २०,००० कोटी रुपयांवर आणून ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे वाढत्या वित्तीय तुटीबाबत काहीसा दिलासा मिळाला आहे. याचे सकारात्मक पडसाद मुंबई निर्देशांकात एकाच व्यवहारात ३११ अंशांची भर नोंदविण्याच्या रूपात पडले.

देशातील सर्वात जुन्या मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकाचे ३५ हजारी यश बुधवारी भांडवली बाजाराचे सत्र व्यवहार संपुष्टात आल्यानंतर ‘दलाल स्ट्रीट’ येथे केक कापून तसेच फुगे उडवून साजरे करण्यात आले. २६ डिसेंबर २०१७ रोजीचा ३४,०००चा सेन्सेक्सचा प्रवास १७ व्यवहारांमध्ये १,००० अंशांपुढे गेला आहे. भांडवली बाजाराच्या निर्देशांक उसळीत माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे अधिक योगदान राहिले. तर जवळपास शतकी निर्देशांक वाढीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०,८०० नजीक पोहोचला. भांडवली बाजारात गेल्या सप्ताहापासून तेजीचे पर्व सुरू आहे.

मंगळवारची प्रमुख निर्देशांकांची घसरण वगळता यापूर्वी सलग तीन व्यवहारांत सेन्सेक्स तसेच निफ्टीने तेजीसह विक्रमांची नोंद केली होती. वस्तू व सेवा कर परिषदेच्या सुलभतेबाबतच्या संकेतानेही बाजाराला यावेळी बळ मिळाले.