रांगेत सहाव्या दिवशीदेखील भांडवली बाजार नरम राहिला. एकाच व्यवहारात मंगळवारी २०९.०५ अंश घसरणीसह सेन्सेक्स २०,२८१.९१ पर्यंत घसरला. व्यवहारात रुपयाने डॉलरच्या तुलनेत ६४ नजीकची घसरगुंडी अनुभवल्याच्या धास्तीने मुंबई निर्देशांक महिन्याच्या नीचांक पातळीवर आला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६०.७५ अंशांनी घसरत ६,०१८.०५ वर येऊन ठेपला.
अमेरिकन अर्थव्यवस्थेचा सुधार आणि आर्थिक उपाययोजना माघारी घेण्याची शक्यता भारतातील परकी चलन व्यवहारासह भांडवली बाजारातही चिंता निर्माण करत आहेत. यामुळे गेल्या पाचही सत्रांत मुंबई निर्देशांक घसरता राहिला आहे; तर मंगळवारच्या व्यवहारात रुपयादेखील ६४ नजीक घसरण नोंदविताना सलग पाचव्या सत्रात कमकुवत बनला. व्यवहारानंतर जाहीर होणाऱ्या सप्टेंबरमधील औद्योगिक उत्पादन व ऑक्टोबरमधील किरकोळ ग्राहक निर्देशांकाचे सावटही बाजारावर या वेळी नकारात्मकतेत उमटले. प्रवासी वाहन क्षेत्राने घसरण अनुभवली असताना दुचाकी विक्रीने ऑक्टोबरमध्ये गाठलेले यश भांडवली बाजाराला दिवसभरात २०,५८४ पर्यंत घेऊन गेले.
सेन्सेक्समधील ३० पैकी तब्बल २६ कंपनी समभाग घसरले. टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, एचडीएफसी बँक, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, इन्फोसिस, स्टेट बँक, ओएनजीसी, टीसीएस अशा साऱ्याच आघाडीतील समभागांची विक्री झाली. पाोलाद, ऊर्जा व वाहन क्षेत्रीय निर्देशांकांनी घसरणीत वर्चस्व गाजविले.
नव्या संवत्सराला २१,२३९ ने गवसणी घातल्यानंतर सेन्सेक्स आता सहा व्यवहारातील ९५७.४५ अंशांनी ऐतिहासिक विक्रमापासून दुरावला आहे. बाजार १० ऑक्टोबरच्या समान पातळीवर येऊन ठेपला आहे.