भांडवली बाजाराची निर्देशांक झेप नोंदविणारी वायदापूर्ती अखेर

महिन्यातील वायदापूर्तीची अखेर करताना सेन्सेक्स गुरुवारी त्याच्या पंधरवडय़ाच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला. तर निफ्टीलाही त्याचा ८,१०० पुढील स्तर पुन्हा गाठता आला.

एकाच व्यवहारात १५५.४७ अंश वाढ नोंदवून सेन्सेक्सची २६,३६६.१५ वर दिवसअखेर झाली. मुंबई निर्देशांकाचा हा १९ डिसेंबर रोजीच्या २६,३७४.७० या टप्प्यानंतरचा हा वरच्या दिशेतील प्रवास ठरला. तर ६८.७५ अंश वाढीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीला ८,१०० च्या पुढे, ८,१०३.६० वर स्थिरावता आले. प्रमुख निर्देशांकांचाही गेल्या पंधरवडय़ातील हा वरचा टप्पा नोंदला गेला.

गुरुवारी डिसेंबरच्या वायदापूर्तीच्या अखेरच्या सत्रातील व्यवहार झाले. परिणामी गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

परकी चलन मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपया भक्कम बनल्याचेही बाजारात स्वागत झाले. गुरुवारच्या व्यवहाराची सुरुवात तेजीसह करताना सेन्सेक्स २६,४२९.४१ या व्यवहारातील वरच्या टप्प्यावर पोहोचला. तर त्याचा किमान सत्र स्तर २६ हजारावरच, २६,१६६.६७ राहिला. तर निफ्टी व्यवहारात ८,०२०.८० ते ८,१११.१० असा प्रवास करणारा ठरला.

सेन्सेक्समध्ये एनटीपीसी १.६८ टक्क्य़ांनी वाढला. त्याचबरोबर टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, एचडीएफसी, टीसीएस, रिलायन्स, एचडीएफसी बँक, टाटा स्टील यांचे मूल्य १.६४ टक्क्य़ांपर्यंत वाढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ग्राहकपयोगी वस्तू, तेल व वायू, पोलाद आदी निर्देशांक १.६७ टक्क्य़ांर्पयच उंचावले. सेन्सेक्समधील ३० पैकी २३ समभाग वाढले. तर घसरलेल्या ७ समभागांमध्ये सन फार्मा, अदानी पोर्ट्स, लार्सन अँड टुब्रो, इन्फोसिस, गेल, पॉवरग्रिड, आयसीआयसीआय बँक, डॉ. रेड्डीज यांचा क्रम राहिला.

भांडवली बाजारात बुधवारी संमिश्र हालचाल नोंदविली गेली होती. असे करताना सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ तर निफ्टीत नाममात्र घसरण झाली होती. गुरुवारी महिन्याबरोबरच २०१६ मधीलही शेवटचे वायदा व्यवहार झाले.

आंतरराष्ट्रीय बाजारात प्रमुख आशियाई निर्देशांक संमिश्र राहिले. तर युरोपीय बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली.

रुपया भक्कम; तर सोने-चांदी दर संमिश्र

गेल्या सलग दोन व्यवहारांपासून डॉलरपुढे कमकुवत ठरणारा रुपया गुरुवारी १४ पैशांनी भक्कम बनला. स्थानिक चलन दिवसअखेर ६८.१० वर स्थिरावला. त्यात गेल्या दोन सत्रात ५० पैशांची घसरण नोंदली गेली आहे. तर मुंबईच्या सराफ बाजारात चांदीचा दर गुरुवारी एकदम ५६५ रुपयांनी वाढून किलोसाठी ३९,८६५ रुपयांवर गेला. सोने दर मात्र तोळ्यासाठी १२५ रुपयांनी कमी होत २७,६९५ रुपयांवर स्थिरावले.

गेल्या दोन सत्रांपासून बाजारात एक चांगली रक्कम उभारली गेली होती. नफेखोरीच्या अंदाजावर आम्हीही निफ्टीचा ८,१०० स्तर अभिप्रेत केला होता. भांडवली बाजाराचा गुरुवारच्या उत्तरार्धातील व्यवहार अधिक उत्साहाचे ठरले.

समीत चव्हाण, मुख्य विश्लेषक (तांत्रिक), एंजल ब्रोकिंग.

भांडवली बाजाराची गुरुवारची सुरुवात काहीशी स्थिर झाली असली तरी उर्वरित कालावधीत ती वेग घेणारी ठरली. बाजारातील व्यवहाराच्या शेवटच्या अध्र्या तासात तर खरेदीकरिता अधिक जोर दिसून आला. आरोग्यनिगा व्यतिरिक्त अन्य क्षेत्रीय निर्देशांकांची कामगिरी उल्लेखनीय ठरली.

कार्तिकराज लक्ष्मणन, वरिष्ठ निधी व्यवस्थापक (समभाग), बीएनपी पारिबा म्युच्युअल फंड.

निश्चलनीकरणाचे विपरित परिणाम झाल्याची ओरड सध्या सुरू आहे. मात्र देशातील प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कर संकलन चालू आर्थिक वर्षांत १९ डिसेंबपर्यंत टक्केवारीबाबत दुहेरी आकडय़ाने वाढले आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा रब्बीचे प्रमाण ६.३ टक्क्य़ांनी वाढले आहे. आयुर्विमा व्यवसाय, पेट्रोलियम पदार्थाची मागणी तसेच पर्यटन, म्युच्युअल फंड या क्षेत्रातही गती नोंदविली गेली आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनावर किरकोळ परिणाम काही काळ जाणवेल. चलन पुरवठा अधिक होण्याच्या दृष्टीने रिझव्‍‌र्ह बँक आणखी चलन अर्थव्यवस्थेत येत्या काही दिवसांमध्ये आणेल.

अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री. (निश्चलनीकरणाच्या ५० दिवसानंतर प्रसारमाध्यमांना संबोधित करताना.)