सेन्सेक्समध्ये २०० अंश भर; तर निफ्टी ८,२०० पुढे

रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदावर न राहण्याबाबत व्यक्त डॉ. राजन यांनी व्यक्त केलेली इच्छा, युरो झोनमधून ब्रिटनच्या बाहेर पडण्याबाबतच्या हालचाली आदींवर नव्या सप्ताहाच्या सुरुवातीलाच निर्देशांक हिंदोळे घेणारे दोन्ही प्रमुख शेअर बाजार सोमवारअखेर तेजीत परिवर्तित झाले.
डॉलरच्या तुलनेत सावरलेला रुपया, भारताच्या रोखे मानांकनाबाबत फिचने व्यक्त केलेली निर्धास्तता आणि सरकारने विस्तारलेली थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा या जोरावर सेन्सेक्समध्ये एकाच सत्रात २०० अंशांची भर तर निफ्टीला ८,२०० पुढील टप्पा गाठता आला.
२४१.०१ अंश वाढीसह सेन्सेक्स २६,८६६.९२ वर तर ६८.३० अंश भर पडल्याने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,२३८.५० पर्यंत पोहोचला. नव्या आठवडय़ाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात करताना असलेली बाजारावरील घसरण छाया सत्रअखेर मोठय़ा फरकाच्या तेजीत नोंदली गेली.
भारतीय रिझव्‍‌र्ह बँक, युरो झोनमधील ब्रिटन या बाबतच्या वृत्ताने दोन्ही प्रमुख बाजारात सोमवारी सकाळच्या सत्रात नरमाईचे वातावरण होते. २०० अंशांच्या घसरणीसह सेन्सेक्स यावेळी गेल्या शुक्रवारच्या तुलनेत २६,५०० च्या खालच्या तळात प्रवास करत होता. दुपारनंतर मात्र केंद्र सरकारच्या नागरी हवाई, सिंगल ब्रॅण्ड रिटेल, संरक्षण आणि औषधनिर्माण क्षेत्रातील १०० टक्के थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढीच्या निर्णयाने बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी व्यवहारात ४३७ अंशांपर्यंत सेनसेक्सने झेप घेतली. दिवसअखेर तो २६,८६७ पर्यंत वाढला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीला सोमवारच्या सत्रातील ८,१०७.३५ ते ८,२४४.१५ दरम्यानच्या व्यवहारानंतर दिवसअखेर ८,२०० च्या वर, ८,२३८.५० पर्यंत पोहोचता आले.
सेन्सेक्समधील ३० पैकी १८ समभागांचे मूल्य वाढले. यामध्ये टाटा मोटर्स, टाटा स्टील, भारती एअरटेल, इन्फोसिस, टीसीएस, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, डॉ. रेड्डीज, ओएनजीसी, बजाज ऑटो, एनटीपीसी हे आघाडीवर राहिले.
एक वगळता इतर सर्व ११ क्षेत्रीय निर्देशांक तेजीत राहिले. यातही माहिती तंत्रज्ञान, वाहन, पोलाद, भांडवली वस्तू निर्देशांक दोन टक्क्य़ांपर्यंत वाढले होते. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.४० व ०.३७ टक्क्य़ांपर्यंत वाढले.
आंतरराष्ट्रीय बाजारात जपानचा निक्केई, हॉंग काँगचा हँग सेंग, शांघाय कंपोझिट इन्डेक्स अनुक्रमे २.३४, १.६९ व ०.१३ टक्क्य़ांनी वाढले. तर ब्रिटनचा एफटीएसई, पॅरिसचा कॅक ४०, जर्मनीचा डॅक्स ३० हे ३ टक्क्य़ांपर्यंत उंचावले होते.

रुपयात घसरणच; मात्र कमी
मुंबई : रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या मुदतवाढीवरून तमाम आर्थिक, राजकीय वातावरण तापले असतानाच परकी चलन विनिमय मंचावरही त्याचा विपरित परिणाम होत असल्याचे सोमवारी प्रकर्षांने जाणवले. स्थानिक चलनातील डॉलरच्या तुलनेत घसरण सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात तब्बल ५७ पैशांची होती. दिवसअखेर ती काहीशी सावरत २९ पैशांपर्यंत येऊन ठेपली. रुपया सत्रअखेर ६७.३७ वर स्थिरावला. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमती प्रति िपप ५० डॉलरच्या खाली येत असल्यानेही चलन स्थिरावले. तर याच मंचावर पौंडच्या तुलनेत रुपया मात्र मोठय़ा फरकाने अधिक भक्कम बनला. एकाच व्यवहारात तब्बल २.५७ पैशांनी उंचावत रुपया ९८.७२ पर्यंत वाढला.

थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा विस्तार स्वागत!
नागरी हवाई : स्पाईसजेट
रु. ६९.३० +७.३६%
जेट एअरवेज
रु. ५८६.१० +६.५६%
इंटरग्लोब
रु. १,०७१.१५ +६.०३%
संरक्षण :
रिलायन्स डिफेन्स
रु. ६६.१० +७.३९%
भारत ईलेक्ट्रॉनिक्स
रु. १,२८५.१५ +२.०२%
भारत फोर्ज
रु. ७५५.०५ +३.२५%
औषध निर्माण :
सन फार्मा
रु. २८६.५५ +१.७४%
वोक्हार्ड
रु. ८९६.१० +१.६३%
डॉ. रेड्डीज्
रु. ३,०५७.९० +१.७५%

‘त्या काळात’ अधिक अस्वस्थतता..
– नियमित व्यवहारापूर्वी सोमवारी पहिले १५ मिनिटे बाजारात व्यवहार झाले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरांनी मुदतीनंतर राहण्यास असहमती दर्शविल्यानंतर बाजाराने त्यापेक्षा अधिक प्रतिक्रिया ब्रिटनच्या युरो झोनमधून बाहेर पडण्याच्या हालचालींवर व्यक्त केली.
– शुक्रवारी बंद झालेल्या टप्प्यापासून २०० अंशांनी अधिक घसरत सेन्सेक्स या व्यवहारा दरम्यान २६,४३८ पर्यंत घसरला. उपरोक्त दोन्ही घटनांचा महत्त्वपूर्ण परिणाम बाजाराने सप्ताहारंभीच्या व्यवहारात नोंदविल्याचे निरिक्षण जिओजित बीएनपी पारिबासचे आनंद जेम्स यांनीही नोंदविले.
– ‘प्रि-ओपन’ व्यवहारांची अशी प्रक्रिया यापूर्वी सर्वप्रथम २०१० मध्ये (कॉल ऑकशनकरिता) राबविली गेली. यानंतर २०१३ मध्ये ती विस्तारित करून सर्व समभागांकरिता अंमलात आणली गेली.