08 December 2019

News Flash

‘सेन्सेक्स’ची ६४६ अंशांनी झेप

सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँक सर्वाधिक, ५.४५ टक्के वाढीसह प्रमुख निर्देशांकामध्ये आघाडीवर राहिला

सहा सत्रातील घसरणीला खंड

मुंबई : देशातील बँक, वित्त क्षेत्रासंबंधीची अर्थचिंता बाजूला ठेवत पंधरवडय़ावर आलेल्या दिवाळीच्या तोंडावर अर्थ हालचाली वाढण्याची आशेने गुंतवणूकदारांनी बुधवारी भांडवली बाजारात समभाग खरेदीचा सपाटा लावला.

परिणामी, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स थेट ६४५.९७ अंश झेप घेत ३८ हजारांपुढे ३८,१७७.९५ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक बुधवारच्या एकाच व्यवहारात १८६.९० अंशांची उसळी घेत ११,३१३.३० पर्यंत झेपावला.

दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये सोमवारच्या तुलनेत जवळपास दोन टक्क्यांची वाढ झाली. भांडवली बाजार व्यवहारादरम्यानच केंद्रीय मंत्रिमंडळाने सरकारी कर्मचारी व निवृत्तिवेतन धारकांसाठी जाहीर केलेल्या ५ टक्के महागाई भत्ता वाढीचेही गुंतवणूकदारांनी स्वागत केले.

महागाई भत्त्यातील वाढीमुळे लक्षावधी सरकारी कर्मचारी व सेवानिवृत्तांना सणासुदीला तब्बल १६,००० कोटी रुपये मिळणार असून, त्यातून बाजार मागणीला उठाव येऊन, अर्थव्यवस्थेतील कुंठितावस्था दूर करण्यास ही बाब मदतकारक ठरेल, असा विश्लेषकांचा सूर आहे.

मंगळवारी दसऱ्यानिमित्त भांडवली बाजारात व्यवहार झाले नाहीत. ्गेल्या सलग सहा व्यवहारांतील सेन्सेक्स घसरणीमुळे मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे ६.२१ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाही वित्तीय निकालांबाबतही बाजारात बुधवारी आशा निर्माण झाली. गेल्या काही सत्रांपासून विक्री दबाव असलेल्या बँक, वित्त, गृह वित्त, गैरबँकिंग वित्त कंपन्यांच्या समभागांकरिता गुंतवणूकदारांनी बुधवारी मात्र मागणी नोंदविली.

सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँक सर्वाधिक, ५.४५ टक्के वाढीसह प्रमुख निर्देशांकामध्ये आघाडीवर राहिला. भारती एअरटेल, स्टेट बँक, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, कोटक महिंद्र बँक, टाटा स्टील, एचडीएफसी बँक यांचेही समभागमूल्य वाढले.

याउलट, हीरो मोटाकॉर्प, एचसीएल टेक, आयटीसी, टीसीएस, इन्फोसिस, ओएनजीसी, बजाज ऑटो आदी २.६५ टक्क्यांपर्यंत घसरले. तर येस बँकेला निर्देशांकात सर्वाधिक, ५.२६ टक्क्यांपर्यंत नुकसान सोसावे लागले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये दूरसंचार निर्देशांक जवळपास ५ टक्क्यांसह वाढला. बँक, वित्त, पोलाद, स्थावर मालमत्ता, ऊर्जा निर्देशांकांमध्ये ३.६७ टक्केपर्यंत वाढ नोंदली गेली. माहिती तंत्रज्ञान, ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांकांमध्ये एक टक्क्यापर्यंत घसरण झाली.

बाजारातील व्यवहार २१ ऑक्टोबरला बंद

मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवहार येत्या सोमवार, २१ ऑक्टोबर रोजी होणार नाहीत. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात होत असलेल्या विधानसभेच्या २८८ जागांसाठी सोमवारी मतदान असल्याने भांडवली बाजारांनी सुट्टी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे मतदानाच्या दिवशी चलन बाजारातही व्यवहार होणार नाहीत.

First Published on October 10, 2019 1:01 am

Web Title: sensex jumps by 646 point zws 70
Just Now!
X