करोना साथीचे वाढते थैमान आणि अमेरिका-चीन संबंधातील भडका यामुळे जगभरातील भांडवली बाजारातील पडझडीचा ताण येऊन, स्थानिक बाजारातही सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकात गत पाच सप्ताहातील सर्वात मोठी १.८ टक्क्यांची घसरण मंगळवारी अनुभवास आली. गेले काही दिवस निरंतर सुरू असलेल्या बाजार तेजीमुळे वरच्या भावात समभाग विकून नफा पदरी पाडून घेण्याची संधी या निमित्ताने गुंतवणूकदारांनी साधली.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६६०.६३ अंशांनी आपटला आणि दिवसाची अखेर त्याने ३६,०३३.०६ या पातळीवर केली. बरोबरीने निफ्टीनेही सोमवारच्या तुलनेत १९५.३५ अंश गमावून, १०,६०७.३५ या पातळीवर दिवसातील व्यवहारांना निरोप दिला. घसरणीचा सर्वाधिक फटका बँकिंग समभागांना बसला, त्या खालोखाल धातू, वाहन क्षेत्रातील समभागांना विक्रीचा दणका बसला.

एचडीएफसी बँक, एचडीएफसी लि., इंडसइंड, अ‍ॅक्सिस, बजाज फिनसव्‍‌र्ह, स्टेट बँक हे समभाग तीन टक्क्यांच्या घरात गडगडले. मारुती, पॉवरग्रिड या समभागांतही नफा कमावण्यासाठी मोठी विक्री झाली.

प्रमुख निर्देशांकांच्या तुलनेत, मिड व स्मॉल कॅपमधील घसरणीचे प्रमाण कमी होते. मंगळवारच्या व्यवहारात हे दोन्ही निर्देशांक ०.९५ टक्क्यांपर्यंत खाली आले.