जागतिक बाजारातील सकारात्मकतेचे प्रतिबिंब

मंगळवारच्या सत्रातील विश्रांतीनंतर भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी पुन्हा एकदा नव्या टप्प्याच्या दिशेने बुधवारी मुसंडी मारली. जागतिक भांडवली बाजारातील तेजीच्या जोरावर स्थानिक बाजारातही गुंतवणूकदारांकडून मोठय़ा प्रमाणात समभाग खरेदी झाल्याने सेन्सेक्ससह निफ्टीने त्यांचे उच्चांकी स्तर गाठले.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारच्या तुलनेत १९९.३१ अंशांनी वाढून प्रथमच ४१,०२०.६१ या सार्वकालिक उच्चांकी स्तरावर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १२,१००.७० वर स्थिरावला. मंगळवारी घसरण नोंदविण्यापूर्वीदेखील दोन्ही प्रमुख निर्देशांक ऐतिहासिक टप्प्यावर होते.

अमेरिका व चीनदरम्यानच्या व्यापारविषयक वाटाघाटी पुन्हा सुरू होण्याच्या आशेने प्रामुख्याने आशियाई बाजारातील निर्देशांकांमध्ये तेजी नोंदली गेली. त्याचीच सकारात्मक प्रतिक्रिया येथेही उमटली. गुंतवणूकदारांनी मंगळवारी खाली आलेल्या मूल्यांवर समभागांच्या खरेदीचे धोरण अनुसरले.

दोन्ही प्रमुख निर्देशांक व्यवहारात त्यांच्या अनोख्या टप्प्यापुढे मार्गक्रमण करण्यासह बुधवार व्यवहार आटोपले तेव्हा अनुक्रमे ४१ हजार व १२ हजारांच्या पुढे बंद झाले. सेन्सेक्स व निफ्टी प्रत्येकी जवळपास अर्ध्या टक्क्यांनी वाढले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या येत्या आठवडय़ात होणाऱ्या पतधोरणातील व्याजदर कपातीची अपेक्षेनेही खरेदी उत्साहाला बळ दिले.

सेन्सेक्समध्ये येस बँक ७.६५ टक्के वाढीसह अग्रणी राहिला. त्याचबरोबर स्टेट बँक, कोटक महिंद्र बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी लिमिटेड, एचडीएफसी बँक आदी वित्तीय सेवा क्षेत्राशी निगडित समभाग वाढले. मारुती सुझुकी, सन फार्मा, हिंदूुस्थान यूनिलिव्हर, ओएनजीसी, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, हीरो मोटोकॉर्पही वाढले. तसेच इन्फोसिस, एचसीएल टेक, रिलायन्स, वेदांता यांनीही मूल्यवाढ नोंदविली.

विक्रमी निर्देशांक वाटचाल नोंदविणाऱ्या सेन्सेक्समध्ये केवळ सहा समभाग घसरणीच्या यादीत राहिले. लार्सन अँड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, टाटा स्टील, एनटीपीसी, अ‍ॅक्सिस बँक हे त्यातील समभाग होते.

बँक, तेल व वायू, वाहन, पोलाद, ऊर्जा, आरोग्यनिगा आदी क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये १.२२ टक्क्यांपर्यंत भर पडली. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक एक टक्क्यापर्यंत वाढले.