सलग दोन व्यवहारांतील अंश घसरण थोपवत प्रमुख निर्देशांक मंगळवारी पावणेदोन टक्क्यांपर्यंत झेपावले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स एकाच सत्रात ८३४.०२ अंश उसळीने ४९,३९८.२९ पर्यंत उंचावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २३९.८५ अंश वाढीने १४,५२१.१५ वर पोहोचला.

दोन्ही निर्देशांकातील वाढ अनुक्रमे १.७२ व १.६८ टक्के राहिली. गेल्या वर्षी, २५ सप्टेंबरला मुंबई निर्देशांकाने एकाच व्यवहारातील मोठी वाढ नोंदविली होती. दोन सत्रांत मिळून मुंबई निर्देशांकाने १,०००हून अधिक अंशआपटी नोंदविली होती. यामुळे भांडवली बाजार त्याच्या विक्रमी टप्प्यापासूनही दुरावले होते.

मंगळवारच्या सत्रात सेन्सेक्स सोमवारच्या तुलनेत ९३६ अंशांनी वाढला. निर्देशांक व्यवहारात ४९,५०० पर्यंत पोहोचला होता, तर निफ्टी सत्रसमाप्तीपूर्वी १४,५०० पुढील वाटचाल करत होता. दिवसाअखेरही दोन्ही निर्देशांक वरच्या टप्प्यावरच बंद झाले. सप्ताहारंभीच्या तुलनेत मंगळवारची वाढ लक्षणीय ठरली.

सेन्सेक्समध्ये बजाज फिनसव्‍‌र्ह सर्वाधिक, ६.७७ टक्के वाढ नोंदविणारा समभाग ठरला. बजाज समूहातीलच बजाज फायनान्स तसेच एचडीएफसी लिमिटेड व एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रिज, आयसीआयसीआय बँकही वाढले. महिंद्र समूहातील मुख्य महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र व टेक महिंद्र तसेच आयटीसी हे तीनच समभाग घसरणीच्या यादीत राहिले.

सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीच्या यादीत राहिले. त्यातही स्थावर मालमत्ता, पोलाद, भांडवली वस्तू, वित्त निर्देशांक ४ टक्क्यांपर्यंत वाढले. तर मोठय़ा संख्येतील किरकोळ गुंतवणूकदारांच्या पसंतीचे मिड व स्मॉल कॅप प्रत्येकी २ टक्क्यांहून अधिक प्रमाणात वाढले. नव्या अमेरिकी अर्थसाहाय्याच्या आशेने आशियाई बाजारातील अन्य निर्देशांकही वाढले.

गुंतवणूकदार ३.४१ लाख कोटींनी श्रीमंत

पुन्हा एकदा ऐतिहासिक टप्प्याकडे वाटचाल करणाऱ्या मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची मालमत्ता मंगळवारी एकाच व्यवहारात ३.४१ लाख कोटी रुपयांनी वाढली. मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल सत्रअखेर १९६.१९ लाख कोटी रुपयांपुढे पोहोचले. प्रमुख निर्देशांक दोन दिवसातील घसरणीपूर्वी विक्रमी टप्प्यावर विराजमान होते.

पी-नोट्स गुंतवणुकीचा त्रवाषिक उच्चांक

भांडवली बाजारात पी-नोट्सच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्या विदेशी गुंतवणूकदारांची रक्कम डिसेंबर २०२० मध्ये ८७,१३२ कोटी रुपयांवर गेली आहे. गेल्या ३१ महिन्यांतील उच्चांकावर ती पोहोचली आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी या माध्यमातून समभाग, रोखे तसेच संकरित रोखे आदी पर्यायांमध्ये महिन्याभरापूर्वी, नोव्हेंबरमध्ये ८३,११४ कोटी रुपये गुंतविले होते. यंदा ती रक्कम मे २०१८ नंतरच्या गुंतवणुकीपेक्षा अधिक आहे.

सेन्सेक्सच्या ८०० अंशवाढीची ८ कारणे

१. जागतिक बाजारातील तेजी : चिनी अर्थव्यवस्था (२०२० मध्ये २.३ टक्के) कोविडपूर्व पदावर आल्याने चीनसह आशियातील प्रमुख निर्देशांक मंगळवारी तेजीत राहिले. त्याचबरोबर पाश्चिमात्य तसेच युरोपीय भांडवली बाजारातही निर्देशांक वाढ नोंदली गेली.

२. विदेशी गुंतवणुकीचा ओघ : विदेशी गुंतवणूकदारांचा भांडवली बाजारातील निधीओघ गेल्या काही सत्रांपासून कायम आहे. आशियातील प्रमुख अर्थव्यवस्था सावरत असल्याच्या आशेने या गुंतवणूकदारांमध्ये समभाग खरेदीचे सातत्य कायम आहे.

३. अर्थसंकल्पीय तरतूद आशा : महिनाअखेर जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेच्या उभारीसाठी केले जाणाऱ्या उपाययोजनेबरोबरच अर्थव्यवस्था सावरण्याबाबतची आशा स्थानिक गुंतवणूकदारांमध्येही दिसून आली.

४. कंपन्यांच्या नफ्याचे निष्कर्ष : चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीचे कंपन्यांचे वित्तीय निष्कर्ष वाढीव नफ्याचे जाहीर झाल्यानेही गुंतवणूकदारांमध्ये खरेदी उत्साह आहे. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसह बँका, वित्तसंस्थांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे.

५. नफेखोरीचे धोरण कायम : भांडवली बाजारात गेल्या सलग दोन व्यवहारापासून निर्देशांक घसरण सुरू आहे. या दरम्यान सेन्सेक्स १,०००हून अधिक अंशांनी आपटला. परिणामी मंगळवारी गुंतवणूकदारांनी बाजारात नफेखोरी धोरण अवलंबिले.

६. लशीच्या सुपरिणामांची आशा : देशभरात करोनाबाधितांची संख्या काही दिवसांपासून रोडावत आहे. साथआजार प्रतिबंधित लशीचे देशव्यापी वितरण सुरू असून मात्रा उपयोगी पडत असल्याबाबतची आशा बाजारात समभाग खरेदीरूपात व्यक्त होत आहे.

७. जीएसटीबाबत घडामोडी : वस्तू व सेवा करबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी राज्यांचे मुख्यमंत्र्यांबरोबर सोमवारी केलेल्या चर्चेची दखल बाजाराने घेतली. तसेच राज्यांना हस्तांतरित करण्यात आलेल्या ६,००० कोटी रुपयांच्या नव्या टप्प्याचेही स्वागत झाले.

८. किंमतवाढीने दिलासा : आंतरराष्ट्रीय, स्थानिक बाजारपेठेत इंधनाच्या तसेच वाहनांच्या किंमतवाढीमुळे या क्षेत्रातील कंपन्यांच्या महसुलाबरोबरच नफ्यात वाढ होण्याच्या विश्वासामुळे गुंतवणूकदारांनी क्षेत्रातील समभागांची जोरदार खरेदी केली.