भांडवली बाजारातील घसरण सलग सहाव्या सत्रातही कायम राहिली. सप्ताहअखेरच्या व्यवहारात सेन्सेक्ससह निफ्टी एक टक्क्य़ाहून अधिक प्रमाणात घसरले. गुरुवारप्रमाणेच दोलायमान राहिलेल्या बाजाराची दिशा सत्रअखेरीसही नकारात्मकतेकडे झुकलेलीच राहिली. व्यवहारातील अस्थिरता आर्थिक पाहणी अहवालातील देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतच्या उत्सुकतेने सत्रअखेर अधिक खोलात गेली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स एकाच व्यवहारात ५८८.५९ अंशांनी खाली येत ४६,२८५.७७ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांक १८२.९५ अंश घसरण होऊन तो १३,६३४.६० पर्यंत थांबला. मुंबई निर्देशांकाने सत्रात १,२६३.२० अंश आपटी अनुभवली. तर गेल्या सलग सहा सत्रांतील मिळून त्यातील घसरण ३,५०६.३५ अंश राहिली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ७ हून अधिक आहे. तर निफ्टी या दरम्यान १,०१०.१० अंशांने, जवळपास त्याच प्रमाणात घसरला आहे.

शुक्रवारी सकाळी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी चालू वित्त वर्ष २०२०-२१ चा आर्थिक पाहणी अहवाल पटलावर ठेवला. प्रत्यक्षात त्यातील तरतुदी भांडवली बाजाराचे सप्ताहअखेरचे व्यवहार संपुष्टात आल्यानंतर स्पष्ट झाल्या. मात्र दरम्यान देशाचा विकास दर चालू एकूण आर्थिक वर्षांत उणेच राहण्याच्या अंदाजाने गुंतवणूकदारांनी बाजारात समभाग विक्रीचा जोर वाढवला.

मुंबई निर्देशांकातील – सेन्सेक्समधील प्रमुख ३० पैकी तब्बल २६ समभाग घसरणीच्या यादीत राहिले. त्यात डॉ. रेड्डीज्, मारुती सुझुकी, भारती एअरटेल, बजाज ऑटो यांना ५.६९ टक्क्यांपर्यंत फटका बसला. इंडसइंड बँक, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक हे चार समभाग एकूण निर्देशांक आपटीतही मूल्यवाढ नोंदविणारे ठरले.

मुंबई शेअर बाजारातील एकूण १९ पैकी १६ क्षेत्रीय निर्देशांक घसरले. त्यात वाहन, माहिती तंत्रज्ञान निर्देशांक ३ टक्क्य़ांपर्यंत घसरले. किरकोळ गुंतवणूकदारांच्या पसंतीचे स्मॉल कॅप व मिड कॅप निर्देशांक अनुक्रमे पाव व अर्ध्या टक्क्य़ाने घसरले.