समस्त जगाला आपल्या डंखाने कवेत घेऊ पाहणाऱ्या करोना विषाणूबाधितांच्या  संख्येत होत असलेली लक्षणीय वाढ व परिणामी ठप्प होत असलेली समस्त व्यवस्था याबाबतची तीव्र हालचाल सप्ताहारंभीच येथील भांडवली बाजारावर उमटली. सेन्सेक्स  एकाच सत्रात जवळपास ४,००० अंश आपटीने थेट २६ हजारांच्या खाली येऊन ठेपला.  तर १,१०० अंश घसरणीने निफ्टीने त्याचा ७,६०० चा वर्षतळ गाठला.

सत्रअखेर दोन्ही प्रमुख निर्देशांक शुक्रवार बंदच्या तुलनेत प्रत्येकी जवळपास १३ टक्क्य़ांपर्यंत आपटले.

आठवडय़ाच्या पहिल्या दिवशीचे व्यवहार सुरू होताच पहिल्या तासाभरातच व्यवहार ठप्प होण्याची नामुष्की ओढवली. सेन्सेक्स व निफ्टी १० टक्क्य़ांहून अधिक प्रमाणात आ पटल्याने अनुक्रमे मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारात व्यवहारासाठी अटकाव (सर्किट ब्रेकर) लागू झाला. पाऊण तासानंतर व्यवहार सुरू झाल्यानंतरही दोन्ही भांडवली बाजारात समभाग विक्रीवरील दबाव कायम राहिला.

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी समभाग तसेच रोख्यांच्या विक्रीतून तब्बल ११ अब्ज  डॉलरची विक्री केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती २५ डॉलर प्रति पिंपपर्यंत येऊन ठेपल्याची तसेच डॉलरच्या तुलनेत ७६ पर्यंत घसरलेल्या रुपयाची प्रतिक्रियाही भांडवली बाजारावर उमटली. वाढत्या करोना संकटानंतर भारताच्या विकास  दराबाबतच्या वित्तसंस्था, दलाली पेढय़ांच्या आखूड अंदाजाचीही प्रतिक्रिया भांडवली  बाजारावर उमटली.

मुंबई शेअर बाजारातील १,१८० कंपन्यांच्या समभागांनी वर्षभराच्या नीचांकाला स्पर्श  केला. सेन्सेक्समधील सर्व प्रमुख समभाग तसेच मुंबई शेअर बाजारातील सर्व क्षेत्रीय  निर्देशांक घसरणीच्या यादीत राहिले. अ‍ॅक्सिस बँक सर्वाधिक २८ टक्क्य़ांसह तर बँक  निर्देशांक १७ टक्क्य़ांपर्यंत आपटला. मिड कॅप व स्मॉल कॅपलाही १२ टक्के घसरणीचा  फटका बसला.

* देशातील १४५ वर्षे जुन्या भांडवली बाजाराच्या स्थापनेच्या इतिहासात विक्रमी सत्रआपटी नोंदविणाऱ्या मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्ती एकाच व्यवहारातील सत्रात तब्बल १४.२२ लाख कोटी रुपयांनी रोडावली.

*  मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य सप्ताहारंभीच्या सत्रात सुमारे १४.२२ लाख कोटी रुपयांनी कमी होत थेट १०१.८६ लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपले.

* २,०३७ कंपन्यांचे समभाग घसरले. तर २३२ कंपन्यांचे मूल्य वाढले. १३२ कंपन्यांचे समभाग मूल्य स्थिर राहिले.

एकाच सत्रात १४.२२ लाख कोटींचा चुराडा