बुधवारी व्यवहारातील उच्चांकापासून शतकी घसरणीने माघार घेणाऱ्या भांडवली बाजाराने गुरुवारी मात्र ही घट पुरती भरून काढताना सेन्सेक्सला २५,५०० पुढे नेऊन बसविले.
मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक गुरुवारी १०२.३२ अंशांनी वाढून २५,५७६.२१ वर पोहोचला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने २३.०५ अंशांची वाढ राखत ७,६४९.९० पर्यंत मजल मारली.
गुरुवारी बाजारातील व्यवहारानंतर जाहीर होणाऱ्या औद्योगिक उत्पादन व महागाई दराच्या आकडेवारीबाबत सकारात्मकता बाळगत बाजारातील व्यवहारांना उत्साही सुरूवात झाली. पण वरच्या स्तरावर गुंतवणूकदारांनी नफेखोरी करून घेण्याचा यत्न केला. या परिणामी  बँक तसेच औषध निर्माण, माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांनी निर्देशांकांच्या घसरणीस हातभार लावला. व्याजदराशी निगडित कंपनी समभागांमध्ये घसरणीचा जोर राहिला.
बुधवारी दिवसअखेर सेन्सेक्स १०९ अंश घसरणीसह २५,५०० च्याही खाली आला होता. गुरुवारच्या व्यवहाराची सुरुवात मात्र २५,५९७ अशी तेजीसह करत सेन्सेक्सने व्यवहारात २५,६११ पर्यंत झेप घेतली. दरम्यान, २५,४०९ पर्यंत सत्रातील तळ गाठल्यानंतर निर्देशांकाची अखेर मात्र बुधवारच्या तुलनेत शतकी भर घालणारी राहिली.
तरी दोन्ही निर्देशांक त्यांच्या दोन दिवसांपूर्वीच्या व्यवहारात गाठल्या गेलेल्या सर्वोच्च स्तराला मागे टाकू शकले नाहीत. सेन्सेक्सने ११ जून रोजी २५,७३५ च्या उच्चांकाला गवसणी घातली होती, तर निफ्टीने बुधवारी ७,७०० पल्याड मजल मारली होती.
गुरुवारी उशिरा जाहीर झालेल्या एप्रिलमधील औद्योगिक उत्पादन दर व मेमधील किरकोळ महागाई दराच्या बाहेर आलेल्या दिलासादायी आकडय़ांनंतर रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदराबाबत कलाची बाजारात चर्चा सुरू झाली आहे. बाजारात स्मॉल व मिड कॅप निर्देशांकही पुन्हा एकदा मागणीत आले आहेत. एकंदर सकारात्मकतेपायी सेन्सेक्समधील २० समभागांचे मूल्य उंचावले. आरोग्य निगा क्षेत्रीय निर्देशांक सर्वात वरचढ राहिला.