निफ्टीकडून ७,९०० सर; सेन्सेक्समध्ये १९३ अंश भर
आर्थिक सुधारणांना गती मिळण्यास एक निमित्त ठरणारे दिवाळखोरी संहिता विधेयक राज्यसभेत संमत होताच त्याचे गुरुवारी भांडवली बाजाराने तेजीसह स्वागत केले. यामुळे बाजारातील करचिंताही दूर सरली. १९३.२० अंश वाढीसह सेन्सेक्स २५,७९०.२२ वर बंद झाला, तर ५१.५५ अंश वाढीमुळे निफ्टीला ७,९०० वरील स्तर अनुभवता आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक दिवसअखेर ७,९१६.०५ वर स्थिरावला.
सायंकाळी बाजार व्यवहारानंतर जाहीर होणाऱ्या एप्रिलमधील महागाई दर व मार्चमधील औद्योगिक दराच्या प्रतीक्षेनंतरही गुंतवणूकदारांनी गुरुवारी बाजारात खरेदी केली. बाजारात अर्थातच बँक समभागांना मागणी राहिली.  एप्रिल २०१७ पासून मॉरिशस कर लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे भांडवली बाजारात बुधवारी निर्देशांक घसरणीच्या रूपात गुंतवणूकदारांकडून चिंता व्यक्त झाली होती. या दरम्यान सेन्सेक्सने १७५.५१ अंश आपटी नोंदविली होती. सेन्सेक्समध्ये बँक क्षेत्रात आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, एचडीएफसी बँक यांचे समभाग मूल्य ३.४६ टक्क्यांपर्यंत वाढले.