गुंतवणूकदारांच्या मत्तेत २.२५ लाख कोटींनी वाढ

मुंबई : अमेरिका-इराणमधील तणाव निवळत असल्याचे जोरदार स्वागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी भांडवली बाजारात केले. एकाच व्यवहारातील तब्बल ६३५ अंश झेप घेतल्याने सेन्सेक्स परिणामी त्याचा ४१ हजारांचा टप्पा पार करू शकला. तर जवळपास २०० अंश उसळीने निफ्टीला १२ हजारांचा स्तर मागे टाकता आला.

आठवडय़ातील चौथ्या व्यवहारातील तब्बल दीड टक्के निर्देशांक मजल मारल्याने मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १५७.०६ लाख कोटी रुपयांपुढे गेले. यामुळे गुंतवणूकदारांचा एकाच व्यवहारात २.२५ लाख कोटी रुपयांचा लाभ झाला. मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात १.५८ टक्क्यापर्यंत वाढ झाली.

व्यवहारात ६६४.३८ अंशांनी वाढणारा सेन्सेक्स सत्रअखेर ४१,४५२.३५ वर बंद झाला. बुधवारच्या तुलनेत त्यात ६३४.६१ अंश भर पडली. सत्रातील त्याची मजल ४१,४८२.१२ अंशांपर्यंत राहिली. तर १९०.५५ अंश वाढीसह निफ्टी व्यवहार अखेर १२,२१५.९० अंशांवर स्थिरावला.

अमेरिका-इराणमधील युद्धसदृश वातावरणाने गेल्या काही दिवसांपासून येथील भांडवली बाजारात निर्देशांक घसरण नोंदली जात आहे. सप्ताहारंभी तर त्यात मोठी निर्देशांक आपटी नोंदली गेली होती. अमेरिका अध्यक्षांनी बुधवारी माघार घेतल्याचे जाहीर केल्यानंतर त्याचे अपेक्षित पडसाद मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारात उमटले.

सेन्सेक्समध्ये आयसीआयसीआय बँकेचा समभाग सर्वाधिक, ३.८० टक्क्यांपर्यंत वाढून अग्रणी राहिला. तसेच स्टेट बँक, महिंद्र अँड महिंद्र, इंडसइंड बँक, मारुती सुझुकी, एशियन पेंट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज यांचेही मूल्य वाढले. तर टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, एनटीपीसी, सन फार्मा यांचे मूल्य जवळपास २ टक्क्यांपर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाहन, स्थावर मालमत्ता, बँक, वित्त, ऊर्जा २.८३ टक्क्यांपर्यंत वाढले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रीय निर्देशांक घसरणीच्या यादीत राहिला. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप १.५५ टक्क्यापर्यंत वाढले.

रुपयाच्या मूल्यात थेट ४८ पैशांची वाढ

मुंबई : इराणविरोधातील पावले मागे घेत असल्याचे अमेरिकेने जाहीर केल्यानंतर गुरुवारी स्थानिक चलनाचे मूल्य मोठय़ा फरकाने भक्कम बनले. परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपया एकाच व्यवहारात तब्बल ४८ पैशांच्या उसळीसह ७१.२१ वर पोहोचला. भांडवली बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांची समभाग खरेदीही रुपयाला भक्कमता देणारी ठरली. गुरुवारच्या व्यवहारात रुपयाचा प्रवास ७१.५२ ते ७१.१७ असा वरचा राहिला. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती स्थिरावत असल्याचेही स्वागतही परकीय चलन विनिमय मंचावर झाले.