सेन्सेक्सची १२४ अंशांची कमाई  ’ निफ्टी५० कडून ७८०० सर

सलग पाच दिवस सुरू राहिलेल्या घसरणीला मागे टाकत, भांडवली बाजाराने नव्या २०७२ सवंत्सराचा सकारात्मक प्रारंभ बुधवारी केला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने १२४ अंशांची कमाई केली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी ५० निर्देशांकाने ७८००ची तांत्रिकदृष्टय़ा महत्त्वाची पातळी पुन्हा कमावली.

लक्ष्मीपूजनानिमित्त बुधवारी बाजारात तासाभरासाठी मुहूर्ताचे विशेष व्यवहार झाले. या अल्पकालीन व्यवहारात बाजारात विशेष उत्साह दिसून आला. नवीन वर्षांरंभ म्हणून बाजारात प्रतीकात्मक खरेदीचेच केवळ नव्हे तर तुलनेने दमदार खरेदी झाल्याचे दिसून आले. सेन्सेक्सने या विशेष व्यवहाराअखेर २५,८६६.९५ अंशांवर विश्राम घेतला. पण एकेप्रसंगी तो गत सप्ताहात गमावलेली २६ हजाराची पातळी पुन्हा कमावेल इतका तो उसळला होता. बुधवारच्या या व्यवहारात २५,९४४.९३ असा सेन्सेक्सचा उच्चांक राहिला. निफ्टी ५० ने मात्र गमावलेली ७,८००ची पातळी पुन्हा कमावून, ४१.६५ अंशांच्या कमाईसह ७,८२५.०० वर विश्राम घेतला.

बाजाराच्या या मूडपालटाला प्रामुख्याने केंद्रातील मोदी सरकारने पुन्हा आर्थिक सुधारणांच्या मार्गावर धरलेला दमदार फेर हेच कारणीभूत होते. मंगळवारी सायंकाळी सरकारने विविध १५ उद्योग क्षेत्रांमध्ये लक्ष्मीची पावले उमटतील, अशा त्यामधील विदेशी गुंतवणुकीच्या मर्यादेत शिथिलता आणणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा केली. नागरी हवाई वाहतूक, बँकिंग, संरक्षण क्षेत्र, किराणा, प्रक्षेपण अशा विविध क्षेत्रांची कवाडे अधिकच्या विदेशी गुंतवणुकीसाठी खुली करण्यात आली. त्याचे बाजारात आज सकारात्मक पडसाद उमटताना दिसले.

आधीचेकाही दिवस मात्र बाजारात सलगपणे नरमाईचे राहिले आहे. आधीच्या सलग पाच दिवसांच्या पडझडीने सेन्सेक्सने ८४७.३३ अंश गमावले असून, सरलेल्या २०७१ संवत्सराचा निरोपही सेन्सेक्समधील त्रिशतकी घसरणीनेच बाजाराने केला होता.

बुधवारच्या व्यवहाराची सुरुवात मात्र सेन्सेक्सने २०४ अंशांच्या दमदार उसळीसह केली. तथापि ही मुसंडी नफा कमावण्यासाठी विक्री सुरू झाल्यावर टीकाव धरू शकली नाही. अर्थात नव्या वर्षांतील मुहूर्ताच्या खरेदीसह, पदरी काहीसा नफाही बांधून घेणारा शुभारंभही करण्याची प्रथा असल्याचे बा

जारातील या व्यवहारातून दिसून आले. मात्र मुहूर्ताच्या खरेदीचा गुंतवणूकदारांचा पट हा आघाडीच्या उमद्या समभागांपुरता मर्यादित न राहता, स्मॉल आणि मिड कॅप समभागांचाही त्यात समर्पक वाटा राहिला. म्हणूनच बाजारात वधारलेल्या व घसरलेल्या समभागांचे प्रमाण हे खूपच व्यस्त म्हणजे १९२५ विरूद्ध ४७५ असे बीएसईवर राहिल्याचे आढळले.

संवत्सर २०७१ समाप्ती        संवत्सर २०७२ प्रारंभ

(मंगळवार, ११ नोव्हें.)            (बुधवार, १२ नोव्हें.)

सेन्सेक्स २५,७४३.२६             २५,८६६.९५

(-३७८.१४ / -१.४५%)           (+१२३.६९ / +०.४८%)

निफ्टी  ७,७८३.३५             ७,८२५.००

(-१३१.८५ / -१.६७%)           (+४१.६५ / +०.५०%)

 

मुहूर्ताच्या व्यवहारांचे लाभार्थी

’  अ‍ॅक्सिस बँक, सन फार्मा, लार्सन अँड टुब्रो

टाटा स्टील, भेल, कोल इंडिया, ल्युपिन, हिंडाल्को

वेदान्त लि., टाटा मोटर्स, स्टेट बँक आणि रिलायन्स

दिवाळीतील लक्ष्मीपूजनापासून व्यापारी वर्गाचे प्रथेने नववर्ष सुरू होते. बुधवारी म्हणूनच आधी चोपडय़ांचे विधि वत पूजन करून घेऊनच व्यापाऱ्यांचे मुहूर्ताचे व्यवहार सुरू झाले.

दोन्ही राष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवहार हे गुरुवारी दिवाळी बलिप्रतिपदेनिमित्त बंद राहतील. त्यामुळे शुक्रवारी बाजारात नियमित व्यवहार सुरू होतील.

लक्षणीय घडामोडी :

डिसेंबर २०१५ पासून अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हची संभाव्य व्याजदर वाढ

त्याला प्रतिसाद म्हणून देशातील पत व आर्थिक धोरणे

२०१६-१७ चा केंद्रीय अर्थसंकल्प व अर्थसुधारणांची स्पंदने

१ एप्रिल २०१६ पासून अस्तित्वात येणारी वस्तू व सेवा कर पद्धती

मान्सून आणि कृषी उत्पादन स्थिती

 

सरलेल्या संवत्सरावर एक दृष्टिक्षेप..

वर्षभरात सेन्सेक्सचा ३०,०२४.७४ तर निफ्टीचा ९,११९ सर्वोच्च टप्पा

संपूर्ण संवत्सरातील सेन्सेक्सची दशकातील तिसरी सुमार कामगिरी

विविध क्षेत्रांतील १७ नव्या दमाच्या कंपन्यांची भांडवली बाजारात सूचिबद्धता

समभागांमध्ये मारुती सुझुकी (+४६%) तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये आरोग्यनिगा (+२०%) निर्देशांकाची सर्वोत्तम कामगिरी

अपुरा व अनियमित पाऊस, कंपन्यांचे निराशाजनक तिमाही निकाल, राज्यातील निवडणुकांमध्ये मोदी लाटेला लागलेल्या ओहोटीच्या सुस्पष्ट संकेतांनी भांडवली बाजारात अस्वस्थता

चीनमधील आर्थिक मंदी, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील चढ-उतारांच्या रूपात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे नियत सावट

 

 

नव्या संवत्सरासाठी बाजार तज्ज्ञांचा अग्रक्रम :

 

’ चंद्रेश निगम, मुख्याधिकारी, अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंड

१. वित्तीय सेवा

२. वाहन

३. उद्योग

४. माहिती तंत्रज्ञान

५. औषधनिर्माण

’ दिनेश ठक्कर, अध्यक्ष, एंजल ब्रोकिंग

१. आरोग्यनिगा

२. वाहन

३. पायाभूत सेवा

४. बँक

५. बिगरबँकिंग वित्तसंस्था

 

’ मोतीलाल ओसवाल, अध्यक्ष, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस

१. बँक, २. पायाभूत सेवा

३. वाहन, ४. औषधनिर्माण

५. निर्यातप्रधान क्षेत्र

 

’ अमर अंबानी, प्रमुख संशोधक, इंडिया इन्फोलाइन

१. वाहन

२. ग्राहकोपयोगी वस्तू

३. वाहनांचे सुटे भाग

४. बंदरे ५. संरक्षण

 

’ पंकज पांडे, प्रमुख संशोधक, आयसीआयसीआय डिरेक्ट

१. वाहन,

२. सिमेंट

३. भांडवली वस्तू

४. ग्राहकपयोगी वस्तू

५. एफएमसीजी

 

जिमीत मोदी, मुख्याधिकारी सॅम्को सिक्युरिटीज्

१. दुचाकी निर्माते (बजाज ऑटो, हीरो मोटोकॉर्प)

२. स्थावर मालमत्ता क्षेत्र (डीएलएफ, शोभा डेव्हलपर्स)

Eco-11