प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी राष्ट्रपतींचे उद्गार; ५ लाख कोटी डॉलर ‘जीडीपी’चे लक्ष्य

मुंबई : ‘सेवा क्षेत्र’ हा २१ व्या शतकातील जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सेवा क्षेत्र आणि तंत्रज्ञानाच्या समन्वयातून देशाचे सकल घरेलू उत्पन्न २०२५ मध्ये पाच लाख कोटी डॉलर इतके होऊ  शकते. आणि त्यात एकटय़ा सेवा क्षेत्राचा वाटा तीन लाख कोटी डॉलर इतका असेल. त्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील,असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला.

गोरेगाव येथील प्रदर्शन संकुलात ‘भारतीय औद्योगिक महासंघ’ (सीआयआय), केंद्रीय वाणिज्य विभाग व महाराष्ट्र शासनातर्फे चौथे सेवांविषयक जागतिक प्रदर्शन आणि १२ राष्ट्रीय सेवा क्षेत्रांचा शुभारंभ राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, वाणिज्य विभागाच्या सचिव रिटा टिओटिया यावेळी उपस्थित होते.

देशाच्या आर्थिक आणि गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्राची भूमिका महत्वाची आहे. राज्यात उद्योगांचे जाळे मोठे असून सेवा क्षेत्राच्या विकासामुळे त्यात अधिक भर पडत आहे. सेवा क्षेत्राचे योगदान सकल मूल्याच्या ६१ टक्के आहे. तरुण लोकसंख्या, तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे हुशार तंत्रज्ञ यामुळे भारत जगाला सेवा पुरविण्याच्या स्थितीत येऊन पोहोचला आहे असे सांगून राष्ट्रपती म्हणाले की, सन २०१६ मध्ये देशाची जागतिक सेवा निर्यात ३.४ टक्के होती. ती आता २०२२ पर्यंत ४.२ टक्कय़ांवर जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे भारत हे जगातील गुंतवणूकदारांचे आणि उद्योजकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. गेल्या चार वर्षांत सकल घरेलू उत्पन्नाचा दर ६.९ टक्के राहिला आहे. २०१८—१९ साठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ७.४ टक्के राहील असे भाकीत केले आहे. त्यासाठी सेवा क्षेत्राची भरारी हे प्रमुख कारण असल्याचेही राष्ट्रपतीनी यावेळी सांगितले.

गेल्या चार वर्षांत विदेशी गुंतवणुकीवरील निर्बंध अनेक क्षेत्रात सुलभ करण्यात आले आहेत. परकीय गुंतवणुकीला आकर्षित करणारा जगातील सर्वात मोठा देश म्हणून भारताची ओळख आहे. आर्थिक सेवा, व्यापार आणि प्रोफेशनल सेवा, संशोधन आणि विकास, आदी सेवा क्षेत्रात एप्रिल २००० पासून ५७ टक्के विदेशी गुंतवणूक भारतात झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असल्याचे गौरोद्गारही त्यांनी यावेळी काढले.

राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर होणार — मुख्यमंत्री

आर्थिकवृद्धी आणि रोजगार निर्मितीसाठी सेवा क्षेत्राची भूमिका महत्वाची आहे. सन२०२५ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर होणार असून याच वेळी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक लाख डॉलर होणार असल्याचा  पुनरूच्चार  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. उत्पादन निर्मिती आणि सेवा क्षेत्रात महाराष्ट्र देशात कायमच अग्रेसर असल्याचे सांगत सेवा क्षेत्राच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. सेवा क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील योगदान ५९ टक्के असून ते ६७ टक्कय़ांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सेवा क्षेत्रात राज्याची आघाडी — प्रभू

सेवा क्षेत्रामध्ये भारत जागतिक केंद्र होण्यासाठी राज्यनिहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. महाराष्ट्राने यात आघाडी घेत जागतिक प्रदर्शनाचा सहभागी राज्य झाले आहे.