सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

मोदी सरकार बहुमताने निवडून येण्याचा आनंद या आठवडय़ातही टिकला. रिझव्‍‌र्ह बँकेकडून अपेक्षित व्याजदर कपात व रस्ते, जलमार्ग व अन्य पायाभूत सुविधा क्षेत्रास मिळू शकणारी चालना यामुळे बँका, सिमेंट, बांधकाम अशा क्षेत्रांतील कंपन्यांचे भाव वधारले. जागतिक बाजारातील इंधन दरातील मोठे चढउतार, अमेरिका आणि चीनची व्यापारयुद्धात एकमेकांवर सुरू असलेली कुरघोडी, फेडरल बँकेचे व्याज दरकपातीचे संकेत, नवीन मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबतचे अंदाज, कंपन्यांचे बरे-वाईट तिमाही निकाल अशा दररोज बदलणाऱ्या अनेक घटकांचा ताळमेळ बसत नसल्यामुळे बाजार मर्यादित पट्टय़ात दोलायमान राहिला. अखेर शुक्रवारी सरकारचे खाते वाटप जाहीर झाल्यावर नवीन सरकारबाबतची अनिश्चितता संपली. आठवडाअखेर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) २८०, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (निफ्टी) ७८ अंशांची साप्ताहिक वाढ दाखविली.

हॅवेल्स या घरगुती विद्युत उपकरणे बनविणाऱ्या कंपनीच्या नफ्यात मार्चअखेर तिमाहीत घट झाली असली तरी गेल्या वर्षी अधिग्रहण केलेल्या लॉइड्स कंपनीच्या कामगिरीत पुढील वर्षी सुधारणा होईल. कंपनीच्या समभागांकडे लक्ष असले पाहिजे, कारण कंपनीच्या नाममुद्रेला बाजारात चांगला प्रतिसाद आहे.

मिहद्र आणि मिहद्रच्या ट्रॅक्टरविक्रीत घट झाली, पण नवीन श्रेणीतील प्रवासी वाहनांच्या विक्रीतील वाढीमुळे हे वर्ष तरून जायला मदत झाली आहे. येणाऱ्या वर्षांत मोसमी पाऊस, नवीन सरकारची ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी धोरणे, बँकांमध्ये वाढलेली रोकडसुलभता, व्याजदरांतील घट अशा सर्व गोष्टी सकारात्मक घडल्या तर ही कंपनी चांगली आर्थिक प्रगती करेल.

परदेशी गुंतवणूकदारांनी जानेवारी महिन्यापासून भारतीय बाजारातील गुंतवणूक वाढविण्यास सुरुवात केली होती; परंतु मे महिन्यात हात आखडता घेतला होता. पण मोदी सरकारच्या पुनरागमनामुळे त्यांचा भारतीय बाजारावरील विश्वास पुन्हा वाढण्याची शक्यता वाटते.

मोदी सरकारच्या भक्कम बहुमतातील सरकारामुळे धोरणलकव्याची शक्यता पुढील पाच वर्षे फारच कमी आहे. पहिल्या पाच वर्षांच्या काळात वस्तू व सेवा कर, रिझव्‍‌र्ह बँकेची स्वायत्तता आणि दिवाळखोरीविषयक कायदा अशा दूरगामी परिणाम करणाऱ्या धोरणांची अंमलबजावणी करणाऱ्या सरकारकडून, अर्थव्यवस्थेला व रोजगारनिर्मितीला गती मिळेल अशा आणखी ठोस निर्णयांची बाजाराला अपेक्षा आहे. याला जागतिक अर्थव्यवस्थेची आणि मोसमी पावसाची साथ मिळाली तर बाजार निर्देशांकांना नवीन शिखरे गाठणे फारसे दूर नाही. पण त्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी जावा लागेल.

येत्या आठवडय़ातील रिझव्‍‌र्ह बँकेचे द्वैमासिक धोरण, मे महिन्याचे वस्तू-सेवा कर संकलन, वाहनविक्रीचे आकडे आणि गेल्या वर्षांच्या शेवटच्या तिमाहीतील आर्थिक विकासाचा दर अशा आकडेवारीने निर्देशांकांची अल्पकालीन दिशा ठरेल.