संसदेत शुक्रवारी हंगामी अर्थसंकल्प मांडण्यात येणार असतानाच गुरुवारी शेअर बाजाराने मुसंडी मारली. सेन्सेक्सने ६६५. ४४ अंकांची तर निफ्टीनेही १७९. २० अंकांची झेप घेतली असून अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात चैतन्याचे वातावरण दिसून आले.

शुक्रवारी संसदेत हंगामी अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या अर्थसंकल्पात शेतकरी आणि मध्यमवर्गीयांना खूश करण्यासाठी अनेक घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. गुरुवारी याचे पडसाद शेअर बाजारावर उमटले. सेन्सेक्स ६६५. ४४ अंकांनी झेप घेत ३६. २५६. ६९ अंकांवर थांबला. तर निफ्टीनेही १७९. २० अंकांची झेप घेत १०, ८३१ चा पल्ला गाठला. अॅक्सिस बँक, इन्फोसिस, टाटा मोटर्स, गेल आणि टायटन या कंपनीच्या शेअर्सचे भाव वधारले होते. तर यस बँक, बजाज फिनसर्व्ह, झी एंटरटेनमेंट, इंडियाबुल्स हाऊसिंग आणि एचसीएल टेक या कंपन्यांचे शेअर्सचे दर घसरले.

दरम्यान, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. राष्ट्रपतींनी सरकारने केलेल्या कामकाजाचा पाढा वाचून दाखवला. शुक्रवारी पीयूष गोयल हे लोकसभेत हंगामी अर्थसंकल्प सादर करतील. लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारे हे शेवटचे अधिवेशन असून ते १३ फेब्रुवारीपर्यंत चालेल. हंगामी अर्थसंकल्पाद्वारे पुढील चार महिन्यांच्या खर्चासाठी संसदेची मंजुरी घेतली जाईल.