बाजार-साप्ताहिकी ’ सुधीर जोशी

अमेरिका व इराण यांच्यातील संघर्ष चिघळण्याच्या अंदाजाने या आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी बाजाराला मोठा तडाखा दिला आणि जगभरातील बाजारांसोबत आपले दोन्ही प्रमुख निर्देशांक जवळजवळ दोन टक्क्यांनी घसरले. संपूर्ण आठवडय़ात बाजाराचे लक्ष प्रामुख्याने अमेरिका व इराणच्या प्रतिक्रियांकडेच होते व निर्देशांकांची मोठय़ा फरकांची चढउतार सुरू राहिली. अल्प मुदतीचे एकदिवसीय सौदे करणाऱ्यांना ही पर्वणीच होती. परंतु त्यामधील धोकेही तितकेच तीव्र होते. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स १३५ अंशांची, तर निफ्टीत ३० अंशांची किरकोळ वाढ झाली.

इन्फोसिसच्या उत्पन्नात गेल्या तिमाहीच्या तुलनेत एक ते दोन तर नफ्यात चार ते सात टक्यांची वाढ अपेक्षित होती. संपूर्ण वर्षांसाठी नऊ ते दहा टक्के उत्पन्न वाढीचा अंदाज अपेक्षित होता. कंपनीचे तीन महिन्याचे निकाल साधारणत: बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे आले आहेत व चालू आर्थिकवर्षांसाठी उत्पन्न व नफ्याच्या अंदाजात कंपनीने वाढ जाहीर केली आहे. कंपनीमध्ये आर्थिकघोटाळ्याचे कुठलेच पुरावे कंपनीच्या लेखापरीक्षण समितीला मिळाले नाही. त्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापक मंडळाला व पर्यायाने समभागधारकांना ही दिलासा देणारी गोष्ट आहे.

सिमेंट उत्पादकांनी जानेवारीमध्ये किंमत वाढ (पोत्यामागे पाच ते पंचवीस रुपये) केली आहे. तशीच वाढ पुढील महिन्यातही होण्याची शक्यता आहे. गेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे पायाभूत सुविधांना मिळणाऱ्या सरकारच्या पाठबळामुळे धातू व सिमेंटला वाढती मागणी राहील. त्याचा प्रत्यय सिमेंट आणि धातू कंपन्यांच्या या आठवडय़ातील तेजीमधे येतच आहे. योग्य संधी येताच केलेली अल्ट्राटेक सिमेंट, जेके सिमेंट व टाटा स्टील, स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियामधील गुंतवणूक फायदा मिळवून देईल.

मोठे चढ-उतार करणाऱ्या बाजाराच्या अशा काळात जे सामान्य गुंतवणूकदार काहीही सहभाग घेत नाहीत त्यांना धोका कमी असतो. कारण आठवडाभराचा विचार केला तर निर्देशांकांत फारसा फरक पडला नाही. महिन्याभराचा विचार केला तर निर्देशांक चांगले अडीच टक्क्यांहून जास्त वाढले. त्यामुळे दीर्घमुदतीच्या गुंतवणूकदारांनी अशा हालचालींमुळे विचलित होऊ नये. परंतु या आधीच्या काही लेखात म्हटल्याप्रमाणे चढत्या बाजारात थोडी नफारूपी विक्री करून रोकड हाताशी ठेवणाऱ्या सक्रिय गुंतवणूकदारांना चांगले समभाग खरेदी करण्याची संधी मात्र मिळते.

सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर पाच टक्के राहण्यावर शिक्कामोर्तब झाले आणि त्यामधील वाढ धीम्या गतीने होण्याचे भाकीत वर्तविले जात आहे. पण दुसरीकडे बाजार मात्र वेगाने वर जात आहे. ज्यामधे मिडकॅप व स्मॉलकॅपमधील निवडक कंपन्यांचा समावेश आहे. जो उद्योग जगतात नवे हिरवे कोंब उगवण्याची आशा दाखवीत आहे. सरकार विविध गटांशी अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उपायांबाबत चर्चा करीत आहे व या महिनाअखेर येणाऱ्या अर्थसंकल्पात त्यावर ठोस उपाययोजना होईल या आशेवर बाजाराची सध्याची वाटचाल सुरू आहे. पुढील आठवडय़ात अमेरिका व चीनमधील व्यापारिक तहाच्या पहिल्या फेरीकडे बाजाराचे लक्ष राहील.

sudhirjoshi23@gmail.com