सेन्सेक्स, निफ्टीची सात आठवडय़ांतील सर्वोत्तम सत्रझेप

मुंबई : देशातील नव्या करोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याबाबतचे समाधान सप्ताहारंभी भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांनी व्यक्त केले. सप्ताहारंभीच जवळपास पाऊणदोन टक्के वाढ नोंदवीत प्रमुख निर्देशांकांनी गेल्या सात आठवडय़ांतील सर्वोत्तम सत्रझेप नोंदविली.

सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८४८.१८ अंश वाढीसह ४९,५८०.७३ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २४५.३५ अंश वाढीने १४,९२३.१५ पर्यंत स्थिरावला. ३० मार्चनंतर प्रमुख निर्देशांकांनी प्रथमच सत्रातील सर्वाधिक अंशझेप नोंदविली.

सेन्सेक्स १.७४ टक्के तर निफ्टी १.६७ अंश वाढीने अनुक्रमे ४९,६०० व १५ हजारानजीक पोहोचले. बँक क्षेत्रातील समभागांना सोमवारी भांडवली बाजारात गुंतवणूकदारांकडून अधिक मागणी राहिली. प्रमुख निर्देशांकांनी गेल्या सप्ताहाची अखेरही सकारात्मक नोंदविली होती.

मुंबई शेअर बाजारातील इंडसइंड बँक, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एक्सिस बँक, एचडीएफसी लिमिटेड, बजाज फिनसव्‍‌र्ह या बँक व वित्त क्षेत्रातील समभागांना गुंतवणूकदारांकडून खरेदी मागणी राहिली. तर एल अँड टी, भारती एअरटेल, नेस्ले इंडिया, सन फार्मा, पॉवरग्रिड, मारुती सुझुकी काही प्रमाणात घसरले.

सेन्सेक्समधील प्रमुख ३० पैकी २३ कंपनी समभागांचे मूल्य वाढले, तर उर्वरित सात समभाग घसरणीच्या यादीत राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बँक, वित्त, पोलाद, वाहन निर्देशांक जवळपास ४ टक्क्यांपर्यंत वाढले. तर दूरसंचार, आरोग्यनिगा निर्देशांकांवर विक्री दबाव राहिला.