सहकार क्षेत्रातील अपना बँकेने देशभरातील आठ लाखांहून अधिक दुकानांत खरेदी विनिमयासाठी तसेच एटीएम केंद्रात रोख रक्कम काढण्यासाठी वापरता येईल अशा ‘अपना रुपे डेबिट कार्डा’चे नुकतेच अनावरण केले. अपना बँकेचे अध्यक्ष दत्ताराम चाळके आणि अपना परिवार प्रमुख सुरेश तावडे यांच्या उपस्थितीत दादर येथे झालेल्या कार्यक्रमात बँकेच्या प्रमुख १४ ग्राहकांना हे डेबिट कार्ड प्रदान करण्यात आले. अपना बँकेने अलीकडेच ३४०० कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा ओलांडला असून, रिझव्‍‌र्ह बँकेने चालू वर्षांत बँकेला पाच नवीन शाखांची परवानगी दिली आहे. बँकेच्या सध्या ५२ शाखा कार्यरत असून, ५३वी शाखा लवकरच उरण (रायगड) येथे सुरू होईल, अशी चाळके यांनी माहिती दिली.
‘माय डेंटिस्ट’ला आणखी ५० कोटींचे भांडवली स्फुरण
मार्चमध्ये महिलांसाठी सवलत योजना
मुंबई: देशातील दंतनिगा क्षेत्रातील सर्वात मोठी चिकित्सालय शृंखला ‘माय डेंटिस्ट’ने सीडफंड आणि एशियन हेल्थकेअर फंडाकडून आणखी ५० कोट रुपयांची भांडवली गुंतवणूक आकर्षित केली आहे. २०११मध्ये प्रारंभ करताना मिळविलेल्या बीज भांडवली साहाय्यानंतर कंपनीने मिळविलेले ही दुसऱ्या टप्प्यातील भांडवली मदत आहे. मुंबईत गेल्या वर्षी एप्रिलपर्यंत असलेली ४० माय डेंटिस्ट दालने ही गत १० महिन्यांत वाढून ७२वर गेली असून, मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे शहरापर्यंत झालेला विस्तार हा नव्या भांडवली मदतीतून शक्य झाला असल्याचे माय डेंटिस्टचे मुख्याधिकारी विक्रम व्होरा यांनी सांगितले. सर्व दालनात सामायिक सेवा गुणवत्ता आणि समान व पारदर्शी दररचना हे माय डेंटिस्टचे सर्वात मोठे वैशिष्टय़ असून, प्रत्येक दालनातून दरमहा सरासरी १५ हजार रुग्णांकडून घेतला जाणारा सेवा-लाभ याची प्रचीती देतो, असे व्होरा यांनी सांगितले. माय डेंटिस्टचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे सध्याच्या डॉक्टर्ससह ४०० पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांच्या ताफ्यात ९० टक्के महिला आहेत. महिला शक्तीच्या सामर्थ्यांचा गौरव म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून संपूर्ण मार्च महिन्यात सर्व ७२ दालनांत येणाऱ्या महिला दंतरुग्णांना सर्व प्रकारच्या उपचारांमध्ये घसघशीत सवलत देणारी ‘स्माइल’ योजना राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे.