जनरल मोटर्सने भारतीय बाजारपेठेत शेव्हरोले क्रूझचे अद्ययावत रूप दाखल करून सणासुदीत ग्राहकांना पसंतीसाठी आणखी एक उमदा पर्याय दिला आहे. अनेक नव्या आणि आधुनिक वैशिष्टय़ांसह दाखल झालेली शेव्हरोले क्रूझचे बाह्य़रूप नव्या रंगसंगतीची भर पडल्याने चित्ताकर्षक बनले आहे. ज्यामुळे याच श्रेणीतील टोयोटा करोला अल्टीस, स्कोडा ऑक्टेव्हिया, होंडा सिव्हिक आणि फोक्सवॅगन जेट्टा या मोटारींना एक तगडा स्पर्धक बनून ती पुढे आली आहे. वेगवेगळ्या तीन प्रकारांत उपलब्ध शेव्हरोले क्रूझची किंमत रु. १३.७६ लाखांपासून सुरू होऊन रु. १६.१६ लाखांपर्यंत जाते. किमतीबाबत तिने स्पर्धाशीलतेला खतपाणी घातले आहे.
राज्य बँकेकडून सरकारला  ७ कोटींचा लाभांश
मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने राज्य सरकारच्या बँकेतील भागभांडवलावर लाभांशापोटी ७ कोटी रुपयांचा धनादेश बुधवारी प्रदान केला. बँकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विजय कुमार अग्रवाल आणि व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना धनादेश दिला. बँकेने तब्बल आठ वर्षांनंतर प्रथमच आपल्या सभासदांना लाभांश दिला आहे.ह्ण

‘महावितरण’च्या शिंदे आणि सोनवणे यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव
मुंबई: ‘महावितरण’चे संचालक (प्रकल्प) प्रभाकर शिंदे आणि वसई मंडळाचे अधीक्षक अभियंता जितेंद्र सोनवणे यांचा त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल एका विशेष समारंभात राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अलीकडेच रवींद्र नाटय़मंदिरात झालेल्या ‘अभियंता गौरव २०११-१२’ समारंभात महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांतील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अभियंत्यांचा पहिल्यांदाच गौरव करण्यात आला. याप्रसंगी जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागातील २४ अभियंत्यांचाही सत्कार करण्यात आला. सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला जलसंपदामंत्री सुनील तटकरे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री दिलीप सोपल, शशिकांत शिंदे, ऊर्जा सचिव आणि महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता उपस्थित होते.

रामलिंग राजूविरुद्ध पाच वर्षांनी आरोपपत्र
हैदराबाद: आकडे फुगविलेल्या ताळेबंदाच्या प्रकरणात सत्यम कम्प्युटर सव्‍‌र्हिसेसचा संस्थापक व अध्यक्ष रामलिंगा राजू याच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने पाच वर्षांनंतर आरोपपत्र दाखल केले. राजूव्यतिरिक्त या प्रकरणातील तब्बल २१२ व्यक्ती तसेच कंपन्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने येथील अतिर्कित मुख्य महानगर दंडाधिकारी तसेच विशेष सत्र न्यायाधीशांसमोर एकगठ्ठा तपास अहवाल सादर केला. केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत केलेल्या तपासानंतर पैशाच्या गैरव्यवहाराच्या आरोपाखाली राजू आणि २१२ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती न्यायालयात तपास यंत्रणेमार्फत देण्यात आली. २००८ मधील या प्रकरणात संचालनालयाने यापूर्वीच १०७५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राजूसह त्याचा भाऊ व सत्यमचा माजी व्यवस्थापकीय संचालक रामा राजू याचेही नाव आरोपपत्रात आहे. २१३ पैकी ४७ व्यक्ती तर सत्यमसह १६६ कंपन्यांची नावे यात आहेत. आरोपपत्रांमध्ये १०७५ कोटी रुपयांच्या ३५० अचल संपत्ती व ५ चल संपत्तींचा समावेश आहे. २००१ पासूनचा सत्यमचा ताळेबंद खोटा होता, अशी कबुली राजू याने २००८ मध्ये दिली होती.