‘इंडोको रेमिडिज’च्या निर्यात व्यवसायात २६ टक्क्य़ांनी वाढ

मुंबई: औषधी निर्माणातील अग्रेसर इंडोको रेमिडिज लिमिटेडने जानेवारी ते मार्च २०१५ तिमाहीत २११.६० कोटी रुपयांच्या महसुलावर १८.७ कोटींचा निव्वळ नफा कमावणारी कामगिरी केली आहे.

विशेषत: निर्यात आघाडीवर निरंतर सुधारामुळे आंतरराष्ट्रीय व्यवसायात वर्षभरात झालेल्या २६ टक्क्य़ांच्या वाढीचे या कामगिरीत मोठे योगदान आहे, असे कंपनीचे अध्यक्ष सुरेश कारे यांनी सांगितले. याच वर्षभरात कंपनीच्या देशांतर्गत व्यवसायातही १७ टक्क्य़ांची वाढ झाली आहे.

कंपनीने सरलेल्या तिमाहीत दोन नवीन उत्पादने प्रस्तुत करून आपल्या नवीन औषधांची संख्या १९ वर नेली आहे. अमेरिकी बाजारपेठेत इंडोकोने स्वबळावर व आपल्या भागीदारांच्या माध्यमातून ५० नवीन औषधांच्या परवानगीसाठी अर्ज सादर करण्याची तयारी केली आहे, त्यापैकी ७ औषधांना मंजुरी मिळाली आहे.

कंपनीच्या संचालक मंडळाने २०१४-१५ आर्थिक वर्षांकरिता भागधारकांना ८० टक्के म्हणजे प्रति समभाग १.६० रुपये लाभांश घोषित केला आहे.

 डोंबिवली बँकेची गोरेगाव येथे नवीन शाखा

मुंबई: डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या गोरेगाव येथे आरे रोड,  स्टेशनजवळील (पश्चिमेला) नवीन शाखेचा येत्या शनिवारी ६ जूनला उद्घाटन समारंभ योजण्यात आला आहे. शाखा शुभारंभाचा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता इव्हेंट बँक्वेट हॉल, फिल्मिस्तान स्टुडिओसमोर, गोरेगाव (प.) येथे होत असून राज्याच्या नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, महिला व बालकल्याण तसेच अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री विद्याताई ठाकूर या उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भाग संघचालक चंद्रशेखर सुर्वे यांची कार्यक्रमाला पाहुणे म्हणून उपस्थिती असेल. बँकेची ही मुंबईतील सातवी, तर एकूण ४६ वी शाखा आहे. लवकरच गिरगाव, साकीनाका (अंधेरी) व अंबरनाथ (एमआयडीसी) या ठिकाणी बँकेच्या शाखा कार्यान्वित होणार आहेत.

भारतीय सॉफ्टवेअर कंपनीचा आंतरराष्ट्रीय गौरव

मुंबई: अल्टियस सॉफ्ट या सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनीला ‘आर्च ऑफ युरोप २०१५’ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार कंपनीच्या प्रमुख अर्चना नवले यांनी स्वीकारला. गुणवत्ता व नाविन्यपूर्ण संकल्पनांसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याची माहिती कंपनीचे सहसंस्थापक संतोष नवले व समीर भोसले यांनी दिली.

 सन फार्माला घसरण-धक्का

मुंबई : रॅनबॅक्सी या अन्य कंपनीला विलिन करून घेतल्यानंतर, निरंतर घोडदौड सुरू असलेल्या सन फार्माच्या समभागाला सोमवारी बाजारात झालेल्या व्यवहारांनी जबर हादरा दिला. गत सहा वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरगुंडी या समभागाने कंपनीच्या मार्च तिमाहीतील अपेक्षेपेक्षा विपरीत झालेल्या कामगिरीपायी अनुभवली. विक्रीच्या जोरदार हल्ल्याने समभागाने सत्राच्या प्रारंभीच १० टक्क्य़ांनी घसरगुंडी दाखविली. दिवस सरत गेला तशी ती सावरली. तरी ८.९९ टक्के घसरणीसह समभाग ८७९ रुपयांवर स्थिरावला.

 बँक ऑफ इंडियाची शतकपूर्ती वाटचाल संग्रहालयाच्या रूपात

मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाची मुंबईतील मुख्य शाखा फोर्ट येथे ‘बँक ऑफ इंडिया संग्रहालया’चे उद्घाटन रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांच्या हस्ते आणि बँकेच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका विजयालक्ष्मी अय्यर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे खाते असलेली बँक असा बहुमान गाठीशी असलेल्या या बँकेच्या १०० वर्षांच्या ऐतिहासिक वाटचालीचा आढावा घेणारे अभिक रॉय लिखित पुस्तकाचेही यानिमित्ताने डेप्युटी गव्हर्नरांनी अनावरण केले.