मुंबई : रोजच्या कमाईवर पोट अवलंबून असलेले कारागीर, स्वयंरोजगार करणारे, ओला-उबर टॅक्सीचालक अशा मंडळींना आवश्यक तेवढे अल्पावधीचे कर्जसाहाय्य मिळवून देणारा नवउद्यमी उपक्रम पुणेस्थित बॉन फ्लिट सोल्युशन्स लिमिटेडने पुढे आणला आहे. बँकेत खातेही नाही आणि पर्यायाने पतविषयक पूर्वइतिहास नसलेल्यांचा बँका व वित्तसंस्थांशी दुवा जुळवून देणारे बॉन क्रेडिट कार्ड कंपनीने प्रस्तुत केले आहे.

बॉन फ्लिट सोल्युशन्सने सर्वप्रथम ओला-उबरचालकांपासून बॉन कार्डचा वापर सुरू केला आणि आज वर्षभराच्या कार्यान्वयनानंतर सर्वच मागणीप्रमाणे सेवा देणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा रोखीवर आधारित व्यावसायिकांसाठी तो एक महत्त्वाचा आधार ठरला आहे. वेगाने डिजिटल बनत असलेल्या युगातील त्यांचा रोकडपर्यायी सांगाती, इतकेच नव्हे तर त्यांच्या आर्थिक नियोजनाला यातून हातभार लावला गेला आहे, असे बॉन फ्लिट सोल्युशन्सचे संस्थापक आणि मुख्याधिकारी भास्कर कोदे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

वाहनात इंधन भरायचे असल्याने ग्राहकांना प्रवास भाडे रोख रकमेत चुकते करण्याची विनवणी करणारे अन्यथा आलेले भाडे ओला-उबरचालकांकडून रद्दबातल केले गेल्याचा अनुभव प्रवाशांसाठी नवीन नाही. परंतु बॉन कार्डच्या साहाय्याने एकाच वेळी दोन दिवसांसाठी पुरेल इतके ‘फुल टँक’ इंधन भरल्याने चालकांचा वेळ वाचण्याबरोबरच त्यांना या विनियोगातून सवलतीचाही लाभ मिळविता येत आहे, असे भास्कर यांनी सांगितले. आजच्या घडीला देशभरात सुमारे ३५ हजार बॉन कार्डधारक असून, त्यातील ७० टक्क्यांहून अधिक टॅक्सीचालक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

येत्या काळात बॉन क्रेडिट कार्डची सेवा ही वर्तमानपत्र विक्रेते, दूधविक्रेते तसेच अर्बनक्लॅप मोबाइल अ‍ॅपवर नोंद असलेल्या अन्य छोटय़ा व्यावसायिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे भास्कर कोदे यांनी सांगितले.

बॉन क्रेडिट कार्ड कसे कार्य करते?

छोटय़ा व्यावसायिकांना अल्पावधीसाठी (आठवडा-दोन आठवडे कालावधी) खेळते भांडवल बॉन क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देते. सध्या येस बँक आणि फेडरल बँकेच्या सहयोगाने सुरू झालेले हे को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आहे. हा एक ‘बी टू बी टू सी’ धाटणीचा व्यावसायिक आराखडा आहे. ओला-उबर यांसारख्या टॅक्सी व्यासपीठ त्याचे कॉर्पोरेट सहयोगी, तर टॅक्सीचालक कार्डधारक असल्याचे भास्कर यांनी सांगितले. शिवाय हे कार्ड टॅक्सीचालक केवळ इंधन भरण्यासाठी आणि आठवडय़ासाठी किमान ५०० रुपये ते कमाल १०,००० रुपये मर्यादेपर्यंत कार्डाद्वारे विनिमय करेल, अशी तंत्रज्ञानात्मक तजवीज केली गेली आहे. आठवडय़ाला १०,००० रुपयांचा विनिमय झाल्यास केवळ १५० रुपये व्याजरूपात अतिरिक्त परतफेड टॅक्सीचालकाला करावी लागेल. शिवाय ओला-उबर व्यासपीठच कॉर्पोरेट भागीदार असल्याने, टॅक्सीचालकाच्या आठवडय़ाच्या कमाईतून कार्डाद्वारे केल्या गेलेल्या विनिमयाचा भरणा पूर्ण केला जातो.