News Flash

स्मॉल-मिड कॅप समभागांत पडझड सुरूच!

विक्रीचा दबाव बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही कायम

भांडवली बाजारात समभागांच्या विक्रीचा दबाव बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. स्थानिक तसेच विदेशी गुंतवणूकदारांच्या समभाग विक्री धोरणाने सेन्सेक्स बुधवारी ६३.६१ अंश घसरणीसह ३०,३०१.६४ वर बंद झाला. तर २५.६० अंश घसरणीसह निफ्टी ९,३६०.५५ वर स्थिरावला.

मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकाची पुन्हा वाताहत झाली. किरकोळ गुंतवणूकदारांचे हे पसंतीचे निर्देशांक जवळपास दीड टक्क्यांपर्यंतची घसरण नोंदविणारे ठरले. वस्तू व सेवा कर प्रणालीचे लाभार्थी ठरणारे अनेक कंपनी समभाग या निर्देशांकांमध्ये समाविष्ट असल्याने गुंतवणूकदारांनी ते सलग तिसऱ्या दिवशी विकून लाभ पदरात पाडून घेतला.

ब्रिटनमधील दहशतवादी हल्ल्यातून जागतिक भांडवली बाजार अद्यापही सावरलेले नाहीत. तसेच भारताने पाकच्या छावण्यांवर केल्या हल्ल्याचेही सावट बुधवारी येथील बाजारात उमटले. आशियाई, युरोपीय बाजारांसह येथील प्रमुख निर्देशांक बुधवारीही नकारात्मक प्रवास करते झाले.

गेल्या दोन व्यवहारांतील मिळून मुंबई निर्देशांकातील घसरण २०५.७२ अंश नोंदली गेली आहे. तर बुधवारच्या विस्तारित घसरणीने निफ्टीने त्याचा ९,४००चा स्तरही अखेर सोडला.

गेल्या सत्रातील घसरणीनंतर प्रमुख निर्देशांकाची बुधवारच्या व्यवहाराची सुरुवात तेजीसह झाली होती. सेन्सेक्समध्ये या वेळी शतकी अंश भर पडली होती. मुंबई निर्देशांक या वेळी ३०,५०० नजीक पोहोचला होता. तर निफ्टी ९,४००च्या पुढे होता. दुपारनंतर मात्र हे चित्र बदलत अखेर प्रमुख निर्देशांक पुन्हा एकदा घसरणीचा क्रम राखणारे ठरले.

सेन्सेक्समध्ये लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो हा सर्वाधिक, ३.२२ टक्के घसरणीसह आघाडीवर राहिला. त्याचबरोबर सिप्लाही घसरला. तर डॉ. रेड्डीज्, स्टेट बँक, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र यांचे मूल्य वाढले. तेजीतील समभागांमध्ये टाटा मोटर्ससह गेल इंडिया, अदानी पोर्ट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, टीसीएसही वाढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये भांडवली वस्तू, पोलाद, आरोग्यनिगा, स्थावर मालमत्ता आदी निर्देशांक २.६२ टक्क्यांपर्यंत घसरले.

बाजारात गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीचे अखेरचे व्यवहार होणार आहेत. केरळात दाखल झालेला मान्सून व खनिज तेलदराबाबत प्रमुख तेल उत्पादक देशांच्या बैठकीवर बाजाराची आगामी दिशा ठरेल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 2:04 am

Web Title: small midcap fund marathi articles
Next Stories
1 भांडवली बाजारात विक्रीला जोर; सेन्सेक्स, निफ्टीत मोठी घसरण!
2 एस्सार शिपिंगकडून पॅनामॅक्स मालवाहू जहाजाचे अधिग्रहण
3 तीन भागीदारांच्या साथीने ‘रिया मनी ट्रान्सफर’चा भारतात प्रवेश
Just Now!
X