‘बीएसई’वर सूचिबद्धतेसाठी स्वतंत्र विभाग

नव्या युगाची नांदी ठरलेल्या नवउद्यमी (स्टार्टअप) कंपन्यांना भांडवली बाजारात प्रवेश सुकर व्हावा यासाठी मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसईने पाऊल टाकले आहे. लघू आणि मध्यम अर्थात एसएमई उद्योगांसाठी असलेल्या बाजारमंचावर हा नवउद्यमींसाठी स्वतंत्र विभाग कार्यान्वित करण्यात येणार आहे.

नवकल्पना घेऊन माहिती-तंत्रज्ञान, संलग्न सेवा, जैव-तंत्रज्ञान, जीवनविज्ञान, थ्रीडी प्रिंटिग, अवकाश तंत्रज्ञान आणि ई-व्यापार अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत स्थापित नवउद्यमींना यातून भांडवली बाजारात सूचिबद्धतेची आणि मोठय़ा गुंतवणूकदार वर्गाकडून पाठबळाची वाट खुली झाली आहे. यापूर्वी ९ जुलै २०१८ असे स्टार्टअपसाठी बाजारमंच सुरू करीत असल्याचे बीएसईने घोषित केले होते, परंतु नंतर या अनावरण लांबणीवर पडले. आता मात्र त्या संबंधाने तयारी पूर्ण केली गेल्याचे समजते.

बीएसईने काढलेल्या परिपत्रकात नवउद्यमींच्या बाजारात सूचिबद्धतेचे निकषही निर्धारित केले आहेत. त्यानुसार कंपनीचे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालय अथवा औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग (डीआयपीपी) कडे ‘स्टार्टअप’ म्हणून नोंदणी असणे बंधनकारक आहे. कंपनी किमान दोन वर्षे कालावधीसाठी अस्तित्वात असणे आवश्यक आहे, शिवाय पात्र संस्थागत गुंतवणूकदार (क्यूआयबी) अथवा साहसी भांडवलदार अथवा अधिस्वीकृत गुंतवणूकदाराची या कंपनीत बीएसईकडे सूचिबद्धतेसाठी प्रस्ताव दाखल करेपर्यंतच्या दोन वर्ष आधीपासून गुंतवणूक कंपनीत असायला हवी. अन्य निकषांमध्ये कंपनीकडे सकारात्मक मत्ता असावी आणि कंपनीचे कोणाही प्रवर्तक अथवा संचालकांना नियामक यंत्रणेकडून बंदी अथवा र्निबध नसावेत.

त्याचप्रमाणे सूचिबद्धता मिळवू पाहणाऱ्या कंपनीचे नादारी आणि दिवाळखोरी संहितेअन्वये राष्ट्रीय कंपनी विधी लवाद (एनसीएलटी) पुढे कोणतेही प्रकरण नसावे.

‘स्टार्टअप्स’साठी सूचिबद्धतेसाठी निकष

  • ‘स्टार्टअप’ म्हणून नोंदणी बंधनकारक
  • किमान दोन वर्षे आधीपासून कार्यरत असावी
  • पात्र संस्थागत/ साहसी गुंतवणूकदारांचे दोन वर्षे भांडवल गुंतलेले असावे.
  • प्रवर्तक/संचालकांवर नियामक यंत्रणेचे र्निबध नसावेत.
  • कंपनीवर दिवाळखोरी संहितेनुसार दावा नसावा.