देशातील बँकिंग अग्रणी भारतीय स्टेट बँकेला चालू आर्थिक वर्षांत एकंदर कर्जमागणीला उभारीची आशा असून, निर्धारित १२ टक्क्यांपेक्षा अधिक कर्ज वितरण वाढेल, अशी उमेद स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी व्यक्त केली.

येथे आयोजित ‘फायबॅक’ या बँकिंग परिषदेत बोलताना भट्टाचार्य म्हणाल्या, चालू आर्थिक वर्षांतील तिमाहीत वाटचाल मंद गतीने राहिली असतानाही बँकेच्या कर्ज वितरणाने १२ टक्क्यांची वाढ दाखविली आहे. त्यामुळे वर्षांच्या मध्याला पुनर्वेध घेत कर्ज वितरणात वृद्धीचे सुधारित संकेत निश्चितच दिले जातील. अर्थात ही सुधारणा वरच्या दिशेनेच असेल, अशी त्यांनी पुस्ती जोडली.

एप्रिल ते जून २०१६ तिमाहीत स्टेट बँकेचे कर्ज वितरण वार्षिक तुलनेत ११.४१ टक्क्यांनी वाढून १४,६३,६९० कोटी रुपयांवर गेले. गतवर्षी ते याच तिमाहीअखेर बँकेचे कर्ज वितरण १३,१३,७३५ कोटी रुपये असे होते. उल्लेखनीय म्हणजे सरलेल्या आर्थिक वर्षांत अवघ्या ९ टक्के दराने बँकेचे कर्ज वितरण वाढले होते, जो गत सहा दशकांतील बँकेने नोंदविला नीचांक होता. बँकेने यंदाच्या आर्थिक वर्षांसाठी कर्ज वितरणात १२ टक्के वाढीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. मुख्यत: बँकेच्या किरकोळ स्वरूपाच्या कर्ज वितरणाने २३ टक्क्यांची वाढ गतवर्षी दाखविली आहे.

कर्ज वितरण लक्ष्यासंबंधी मध्यावधी सुधारणा करताना, मुख्यत: मोठय़ा रकमेच्या प्रकल्प वित्तपुरवठय़ाची मागणी लक्षात घेतली जाईल. तथापि प्रकल्प वित्तपुरवठय़ाच्या शक्यता तपासताना, या क्षेत्रातील उच्च कर्ज थकिताचा (एनपीए) पैलूही तपासला जाईल. यापूर्वी ज्या जोखीम घटकांकडे दुर्लक्ष झाले त्यांना लक्षात घेतले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

((   मुंबईत आयोजित ‘फायबॅक २०१६’ वार्षिक बँकिंग परिषदेत स्टेट बँकेच्या अरुंधती भट्टाचार्य.  ))