स्टेट बँकेचे आर्थिक संशोधन टिपणांतून प्रतिपादन

केरळात गेल्या आठवडय़ात धडकलेल्या मोसमी पावसाचा पुढचा प्रवास अडखळणे आणि तो देशात सर्वत्र उशिराने दाखल होणे हे महागाई दराच्या आगामी मार्गक्रमणेच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम साधणारे असेल. किंबहुना उशिराने येणाऱ्या पावसाने तो पुरेसा बरसण्याची आणि संपूर्ण मोसमात सारखा विस्तारण्याच्या शक्यता वधारल्या असून, अन्नधान्यातील महागाईला खाली आणण्यास त्यातून मोठा हातभार लागेल, असा अभिप्राय बँकिंग अग्रणी स्टेट बँकेच्या ताज्या संशोधन टिपणाने दिला आहे.
विलंबाने दाखल होणारा पाऊस हा सामान्य किंवा सरासरीपेक्षा जास्त राहिल्याचे इतिहासात दाखले सापडतात. २००१ सालापासून पावसाच्या मोसमाची विलंबाने सुरुवात झालेल्या सहापैकी चार वर्षांत (६७ टक्के) ही बाब खरी ठरल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ‘देर आये पर दुरुस्त आये’ उक्तीप्रमाणे लांबणीवर ठरणारा पाऊस आर्थिकदृष्टय़ा पथ्यावर पडणाराच ठरतो, असे मत स्टेट बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्य कांती घोष यांनी व्यक्त केले.

सोमवारी जाहीर झालेला मे महिन्याचे किरकोळ किमतींवर आधारित महागाई निर्देशांकाचे ५.७६ टक्के प्रमाण हे एप्रिलमधील ५.३९ टक्क्यांच्या तुलनेत वधारली. महागाई दराचा २१ महिन्यांमधील उच्चांक स्तर असला तरी हा ‘वाईटाचा शेवटचा आघात’ असून, यापेक्षा अधिक महागाई भडकण्याची शक्यता नाही, असाही डॉ. घोष यांनी या अहवालात विश्वास व्यक्त केला आहे. त्यासाठी त्यांनी चार ठोस कारणे पुढे केली आहेत.

एक तर रिझव्‍‌र्ह बँकेने ताज्या पतधोरणातून महागाई दरात वाढीचा धोका व्यक्त करून, त्या संबंधाने आवश्यक खबरदारी म्हणून विशेषत: आगामी महिन्यांमध्ये अन्नधान्य वितरणाच्या यंत्रणेच्या मजबुतीसाठी सरकारला जागे करण्याचे काम केले आहे.
वस्तुत: एप्रिल-मे हे महिने कायम चढय़ा महागाईचे असतात आणि त्यानंतर किमती उतरण्यास सुरुवात होते. प्रत्यक्षात एप्रिल २०१६ मधील अन्नधान्याच्या किमती या ११ वर्षांच्या नीचांक स्तरावर होत्या, ज्या पुढे जाऊन आणखी खाली येण्याचीच शक्यता आहे.
किरकोळ महागाई निर्देशांकात (सीपीआय) अन्नधान्याच्या किमती हाच मोठा घटक आणि गाभा असून, तो येत्या महिन्यांत ४.५ टक्क्यांहून अधिक वाढण्याची शक्यता जवळपास शून्यच असल्याचा डॉ. घोष यांचा कयास आहे. दुसऱ्या बाजूला इंधन घटकाचे महागाईतील योगदान पाहिल्यास तेथे येत्या काळात दिलाशाची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमती वर्षांच्या पूर्वार्धात वधारतात आणि उत्तरार्धात त्या उतरू लागतात हे गत काळातील तपशिलातून दिसून आले आहे. त्यामुळे या घटकाचाही महागाई वाढविण्यास हातभार नसेल.