सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

पावसापेक्षा दमदार जोराने पडणाऱ्या बाजारातील नामवंत मिड कॅप व स्मॉल कॅप कंपन्यांचे समभाग वाजवी भावात घेण्याची हीच संधी आहे.

या आठवडय़ातही बाजाराने घसरण सुरूच ठेवली. अर्थसंकल्पानंतरचा बाजार घसरणीचा हा तिसरा आठवडा! अर्थसंकल्पामध्ये हाती काहीच लागले नाही आणि वर अतिउच्च उत्पन्न गटावर कर-अधिभार यामुळे त्रस्त विदेशी गुंतवणूकदारांनीही काढता पाय घेतला. आठवडाअखेर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) ४५४ तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (निफ्टी) १३४ अंशांची लागोपाठ तिसरी साप्ताहिक घसरण दाखवली.

एचडीएफसी बँकेने तिमाही निकाल जाहीर करताना जरी नफ्यातील २० टक्क्यांहून जास्त वाढ कायम राखली असली तरी बँकेच्या कर्जाच्या गुणवत्तेत थोडी घट होऊन तरतुदीमध्ये ६० टक्के वाढ झाली आहे. वाहन कर्जातील वाढ कमी होऊन बँकेने किरकोळ कर्ज वाटपाचा आलेख खाली येण्याचे संकेत दिले आहेत. बजाज फायनान्सनेदेखील नफ्यात ३४ टक्के वाढ जाहीर केली. पण भविष्यातील कर्ज वाटपाबाबत नरमाईचे संकेत दिले. या संकेतांची बाजाराने दखल घेतली व सदैव आघाडीवर असणाऱ्या या कंपन्यांचे बाजार मूल्य सुमारे ५ टक्क्यांनी घसरले. वाहन क्षेत्रात बजाज ऑटोने अपेक्षेप्रमाणे नफा कायम राखला तर मारुती सुझुकी व टाटा मोटर्सच्या नफ्यातील घट अपेक्षितच होती.

ग्रामीण मागणी कमी होण्याच्या बोलबाल्यात डाबरने आपल्या विविध नाममुद्रांवर व त्यांच्या विपणनावर लक्ष केंद्रित करून विक्रीत ९ टक्के, तर नफ्यात १२ टक्के वाढ केली आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरनेही विक्रीत ६ टक्के, तर नफ्यात १४ टक्के वाढ केली आहे. या वाढीचे प्रमाण कमी असले तरी कठीण काळात नफा टिकून राहणे वाईट नाही. पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रेसर लार्सन आणि टुब्रोने नफ्यात २१ टक्के वाढ करून हाती असणाऱ्या अपूर्त मागण्यांमध्ये ११ टक्के वाढ सूचित केली आहे.

सध्या बाजारातील एचडीएफसी समूह, बजाज समूह, लार्सन आणि टुब्रो, रिलायन्स अशा आघाडीच्या (लार्ज कॅप) कंपन्यांचे भाव खाली येत आहेत. ‘निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक’ वर्षभरापूर्वीच्या तुलनेत निम्म्यावर आहे. बाजार आणखी किती खाली जाणार हे भल्याभल्यांना सांगता येणार नाही. अशा वेळी सामान्य गुंतवणूकदारांनी काय करावे हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे.

विदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा सपाटा, मंदीचे भाकीत, पावसाची अवकृपा अशा नकारार्थी गोष्टी पूर्वीदेखील घडल्या आहेत. बाजार यातून सावरतोच सावरतो. पावसापेक्षा दमदार जोराने पडणाऱ्या बाजारातील नामवंत मिड कॅप व स्मॉल कॅप कंपन्यांचे समभाग वाजवी भावात घेण्याची हीच संधी आहे. मात्र भाव अजूनही खाली येऊ शकतात आणि गुंतवणुकीला पीक विमा योजना लागू नाही! तेव्हा खरेदी टप्प्याटप्यानेच करावी. म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांनी ‘एसआयपी’ सुरूच ठेवाव्यात. येणाऱ्या आठवडय़ात आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस, स्टेट बँक, आयटीसी, एचडीएफसी या सारख्या दिग्गज कंपन्यांचे निकाल, वस्तू व सेवा कराच्या बठकीतील निर्णय आणि शुक्रवारी बँक निफ्टीने घेतलेली बढत कायम राहते का याकडे बाजाराचे लक्ष असेल.