रिलायन्स इंडस्ट्रीज-फ्युचर समूहाच्या व्यवहारात मोडता घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय लवादाचा अ‍ॅमेझॉनच्या बाजूने आलेल्या निवाडय़ाचे तीव्र पडसाद भांडवली बाजारात सप्ताहारंभीच उमटले. सत्रात ७३७ अंशांपर्यंत गटांगळी घेणारा सेन्सेक्स दिवसअखेर ५४० अंशांच्या आपटीसह स्थिरावला, तर निफ्टीनेही सव्वा टक्याहून अधिक घसरणीने १२ हजारांच्या वेशीपासून फारकत घेतली. रुपयाचा डॉलरच्या तुलनेत महिन्याचा नीचांकही भांडवली बाजारातील अस्वस्थेस कारणीभूत ठरला. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या घसरत्या किमतीचीही दखलही बाजाराने घेतली.

मुंबई शेअर बाजाराचे सोमवारी व्यवहार थंडावले तेव्हा सेन्सेक्स ५४० अंश घसरणीने ४०,१४५.५० वर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १६२.६० अंश घसरणीसह ११,७६७.७५ वर  स्थिरावला. शुक्रवारच्या तुलनेत दोन्ही प्रमुख निर्देशांक १.३३ टक्क्यांहून अधिक प्रमाणात रोडावले.