खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केल्यापासून गेल्या दोन दशकांत भारताचा आर्थिक विकासदर सातत्याने सात टक्के राहिला आहे. आताही देशात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असून यंदाच्या आर्थिक वर्षांत विकासदर आठ टक्के नक्कीच राहील असा विश्वास व्यक्त करत केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी गुंतवणूकदारांनी पायाभूत सोयीसुविधा व भांडवली बाजारात अधिकाधिक गुंतवणूक करावी, असे आवाहन येथे आयोजित परिषदेत केले.
दक्षिण आशियाई देशांच्या प्रतिनिधींची येथे महापरिषद आयोजित करण्यात आली असून विविध देशांचे एक हजार प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहेत. परिषदेत बोलताना चिदम्बरम यांनी देशाचे अर्थचित्र मांडले. देशात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असून विकासदर आठ टक्क्यांच्या आसपास असेल असे ते म्हणाले. गुंतवणूकदारांना विविध क्षेत्रांत गुंतवणूक करण्यास संधी असून भांडवली बाजार व पायाभूत सोयीसुविधांमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करणे अधिक सोयिस्कर ठरू शकेल असे चिदम्बरम म्हणाले.
अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या दोन्ही घटकांना सरकारी सुरक्षेचे कवच लाभले आहे, त्यामुळे या क्षेत्रांत गुंतवणुकीला अधिक वाव असल्याचे चिदम्बरम यांनी स्पष्ट केले.
धोरणात्मक गुंतवणूकदारांसाठी तेल व नैसर्गिक वायूच्या क्षेत्रात गुंतवणुकीला अधिकाधिक वाव असल्याचेही त्यांनी सुचवले. सकल राष्ट्रीय उत्पन्नातील महसुली तूट तीन टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा विद्यमान सरकारचा विचार असून त्या दिशेने गांभीर्याने वाटचाल सुरू असल्याचेही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.