मुंबई : बहुराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादने जरी दर्जेदार असल्याची सांगितली जात असली तरी भारतीय परिस्थितीला  साजेसे फेरबदल त्यात अभावानेच आढळतात. विशेषत: बाळांच्या निगेची उत्पादने जसे डायपर, नॅपी, कपडे आदींमध्ये ही उणीव जाणवून येते. या पाश्र्वभूमीवर, हगीज् आणि पॅम्पर्ससारख्या नाममुद्रांच्या तोडीस तोड, परंतु तुलनेत किफायती पर्याय ‘सुपरबॉटम्स’ या नावाने मुंबईस्थित नवउद्यमी महिलेने प्रस्तुत केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महागडय़ा डिस्पोजेबल डायपर्सचे सर्व फायदे देणारेच परंतु रसायन विरहित, मऊ सुती कापडाचे आणि तेही पुनर्वापरयोग्य डायपर्स बनविणाऱ्या ‘सुपरबॉटम अ‍ॅडव्हान्स क्लॉथ डायपर्स’ या कंपनीची मुहूर्तमेढ पल्लवी उटगी यांनी २०१६ मध्ये केली.  अभियांत्रिकीची पदवी घेतल्यावर जमनालाल बजाजमधून व्यवस्थापन शास्त्राची पदवी उटगी यांनी मिळविली. स्ट्राइड्स अर्कोलॅब, पिरामल हेल्थकेअरसारख्या औषधी कंपन्यांतील विपणन आणि उत्पादन विकासाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. अल्पावधीत महिन्याला ६,००० पेक्षा जास्त डायपर्स विकणारा सुपरबॉटम्स हा कापडी लंगोटांमधील ब्रॅण्ड त्यांनी पुढे आणला.

सर्वसाधारणपणे मूल दोन-अडीच वर्षांचे होईपर्यंत डायपर्स वापरले जातात. रोजचे चारपाच डायपर्स आणि प्रत्येकी १३ रुपये सरासरी किंमत, असे ५०,००० रुपयांचे डायपर्स दोन वर्षांत वापरले जातात. शिवाय वापरून फेकलेल्या अ-विघटनशील डायपरमुळे होणारा कचरा आणि पर्यावरणीय हानी हे दुर्गुणही आहेत. त्या तुलनेत सेंद्रिय, तलम, मऊ सुती कापडाचे पाच-सहा थर असलेले सुपरबॉटम्स डायपर्स धुऊन पुन्हा किमान २०० ते ३०० वेळा वापरता येतात. त्यामुळे बाळासाठी आरोग्यदायी १०० टक्के कापडी डायपर्स वापरता येतात, शिवाय खर्चात ७० टक्के बचत होते, असे यामागचे गणित पल्लवी उटगी यांनी मांडले. कंपनीच्या वेबस्थळावरून सुपरबॉटम्सची सर्वात जास्त विक्री ऑनलाइन होते. आघाडीच्या कुरियर कंपन्या व टपाल विभागाशी सामंजस्यामुळे दोन दिवसांच्या आत देशभरात ती पोहचती केली जातात.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Superbottoms diapers challenges multinational companies
First published on: 05-09-2018 at 01:01 IST