१७ टक्क्य़ांच्या अधिमूल्याचा भागधारकांना लाभ

सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रातील अग्रणी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत १६,००० कोटी रुपयांपर्यंत मूल्याच्या ७.६ कोटी समभागांच्या पुनर्खरेदीचा (बायबॅक) निर्णय घेतल्याचे घोषित केले आहे. प्रत्येकी २,१०० रुपये किमतीला प्रस्तावित ही समभाग खरेदी म्हणजे टीसीएसच्या १,७८९ रुपये या गुरुवारच्या बंद भावाच्या तुलनेत १७ टक्क्य़ांचे अधिमूल्य मिळवून देणारी आहे. कंपनीच्या या निर्णयाने शुक्रवारी समभागाने जवळपास तीन टक्क्य़ांनी उसळी घेत १,८४० रुपये असे चालू वर्षांतील उच्चांकी मूल्य मिळविले.

कंपनीकडील रोकड गंगाजळीचा भागधारकांना लाभ मिळवून देण्याच्या धोरणानुरूप ही समभाग पुनर्खरेदी टीसीएसने प्रस्तावित केली आहे. गेल्या वर्षीही प्रति समभाग २,८५० रुपये किमतीने (बोनसपूर्वीचे मूल्य) टीसीएसने भागधारकांकडील ५.६१ कोटी म्हणजे सुमारे १६,००० कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले आहेत. त्यावेळीही १४ टक्के अधिमूल्यासह पुनर्खरेदी किंमत निश्चित करण्यात आली होती. शेअर बाजाराची यंत्रणा वापरून विद्यमान भागधारकांकडून प्रमाणबद्ध पद्धतीने ही पुनर्खरेदी प्रक्रिया राबविली जाईल आणि या प्रक्रियेचा कार्यक्रम यथावकाश मंजुऱ्यांचे आवश्यक सोपस्कार पूर्ण केल्यावर टीसीएसकडून जाहीर केला जाईल.

समभाग पुनर्खरेदीने कंपनीच्या प्रति समभाग मिळकतीत (ईपीएस) सुधार होतो, शिवाय मलूल बाजारस्थितीत समभागाचे मूल्य तरतरीत राखता येते. भागधारकांना त्यांच्या हाती असलेल्या समभागांवर भरभरून लाभ देऊन खूश करण्याचा हा नवीन रुळत असलेला प्रघात आहे. टीसीएसकडून नियमित लाभांशापेक्षा भागधारकांच्या पदरी अधिक रकमेचा लाभ देणारी ही सलग दुसऱ्या वर्षी येऊ घातलेली ही समभाग पुनर्खरेदी आहे. यातून कंपनीने लाभांश वितरण करातून सुटका मिळविली आहे.

सात लाख कोटी बाजारमूल्याची धनी

समभाग पुनर्खरेदीच्या निर्णयावर संचालक मंडळाने शिक्कामोर्तब केल्यानंतर टीसीएसचा समभाग शुक्रवारच्या व्यवहारात २.७५ टक्क्यांनी उंचावत १,८४१.४५ रुपयांवर बंद झाला. टाटा समूहातील या कंपनीचे बाजारमूल्य यामुळे ७,०५,०१२.९८ कोटी रुपयांवर गेले. ७ लाख कोटींचे बाजारधन गाठणारी टीसीएस ही पहिली कंपनी आहे. पैकी एक लाख कोटी रुपये बाजारमूल्य हे केवळ मागील सहा महिन्यात वाढले आहे. मुंबई शेअर बाजारात अव्वल बाजारमूल्य असलेल्या पाच कंपन्यांमध्ये सध्या रिलायन्स (रु. ६.४२ लाख कोटी), एचडीएफसी बँक (रु. ५.२८ लाख कोटी), हिंदुस्थान यूनिलिव्हर (रु. ३.५० लाख कोटी) व आयटीसी (रु. ३.२२ लाख कोटी) यांचा समावेश आहे.