नव्याने होणाऱ्या खासगी बँक स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय १०० अब्ज कोटी रुपयांच्या टाटा समूहाने घेतला आहे. या क्षेत्रातील कंपनीचा विद्यमान ढाचा पुरेसा आहे, अशी दिलेली सबबही रिझव्‍‌र्ह बँकेने मान्य करत टाटा समूहाचा निर्णय मंजूर केला आहे.
नव्या खासगी बँक परवान्यासाठी जुलैअखेर प्राप्त झालेल्या एकूण अर्जानंतर आतापर्यंत कायम राहिलेल्या अर्जदार कंपन्यांची संख्या त्यामुळे आता २५ झाली आहे. अर्ज मागे घेण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडे मंगळवारीच संपर्क साधण्यात आला होता, हे टाटा समूहानेही मान्य केले आहे. या क्षेत्रातील घडामोडींवर समूहाचे लक्ष राहणार असून भविष्यात वाटल्यास पुन्हा या प्रक्रियेत सामील होण्याचा मनोदयही कंपनीने व्यक्त केला आहे. जानेवारी २०१४ पर्यंत पात्र अर्जदारांना बँक परवाने दिले जातील, असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात स्पष्ट केले होते.
नव्या बँक परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या टाटा सन्स लिमिटेडबरोबर रिझव्‍‌र्ह बँकेने संपर्क केला असून कंपनीने आपण अर्ज मागे घेत असल्याचा अंतिम निर्णय घेतल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी सायंकाळी उशिरा जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. कंपनीचा सध्याचा वित्त क्षेत्रातील व्यवसाय पुरेसा असल्याचेही टाटा सन्सने म्हटल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांची नव्या बँक परवान्यांसाठीची माघार मान्य करण्यात येत असल्याचे बँकेने सहायक सर व्यवस्थापक अजित प्रसाद यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
दुसऱ्या फळीतील नव्या खासगी बँक परवान्यासाठी अर्ज करण्याच्या १ जुलै २०१३ रोजीच्या मुदतदिनीपर्यंत २६ कंपन्या, समूहांनी रिझव्‍‌र्ह बँकेकडे अर्ज केले होते. यामध्ये टाटा समूहासह अनिल अंबानी यांची रिलायन्स, आदित्य बिर्ला, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो समूहासह अनेक बिगर बँकिंग वित्तसंस्था, सूक्ष्मवित्तसंस्था, ब्रोकरेज कंपन्या, केंद्र सरकारचा टपाल विभाग, गृहवित्त कंपन्या यांचा समावेश आहे.
व्हिडीओकॉन समूहातील व्हॅल्यू इंडस्ट्रिज लिमिटेडने नव्या बँक परवान्यासाठी अर्ज परत घेत सर्वप्रथम माघार घेतली होती. मात्र चंदीगडच्या के. सी. लॅण्ड अ‍ॅण्ड फायनान्स कंपनीनेही अर्ज केला असल्याने ही संख्या कायम २६ अशीच राहिली. रिझव्‍‌र्ह बँकेने या कंपनीचा अर्ज मुदतीत आला होता; मात्र यादीत त्याचा समावेश नव्हता, असे स्पष्टीकरण सप्टेंबरमध्ये दिले होते. आता टाटा समूहाच्या माघारीनंतर नव्या बँक परवान्यासाठीच्या अर्जदारांची संख्या २५ झाली आहे.
तब्बल दशकानंतर नव्या खासगी बँक परवान्यासाठी दुसऱ्या टप्प्यात रिझव्‍‌र्ह बँकेने जानेवारी २०१३ मध्ये मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. तर याबाबतचे अधिक चित्र जूनच्या सुरुवातीला स्पष्ट करण्यात आले. रिझव्‍‌र्ह बँकेने सर्वप्रथम १९९३ मध्ये दहा बँकांना परवाने दिले. तर २००१ मध्ये कोटक महिंद्र व येस बँकांना परवाने दिले.

सप्टेंबरमधील व्हिडीओकॉनच्या माघारीनंतर टाटा सन्सही बाहेर पडल्याने आता बँक स्पर्धेच्या रिंगणातून दोन्ही उद्योगघराणी बाहेर पाहेर पडली आहेत.

अनिल धीरूभाई अंबानी समूह, आदित्य बिर्ला समूह, बजाज, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, इंडिया बुल्स, श्रीराम, रेलिगेअर  आदी उद्योगसमूह हे त्यांच्या     बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमार्फत रिंगणात उतरले आहेत.