नवी दिल्ली : भारतातील शहरी भागातील नागरिकांना वाढत्या बेरोजगारीविषयी अधिक चिंता असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर या शहरी भारतीयांनी वित्तीय तसेच राजकीय स्थितीसह हिंसा, गुन्हेगारी, गरिबी, वातावरण बदल तसेच सामाजिक असमानता याबाबतही चिंता व्यक्त केली आहे.

‘इप्सॉस’ या संशोधक संस्थेमार्फत भारतासह २८ देशांतील निवडक लोकांचा संकेतस्थळाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जागतिक स्तरावर गरिबी, सामाजिक असमानता तर भारताबाबत बेरोजगारी, हिंसा, गुन्हे तसेच आर्थिक स्थितीबाबतच्या चिंतेचे निरीक्षण नोंदले गेले.

शहरी भागातील अर्ध्याहून अधिक जणांनी बेरोजगारीविषयी चिंता असल्याचे सर्वेक्षणात नमूद केले. तर उर्वरित सर्वेक्षण सहभागींना आर्थिक स्थितीबरोबरच गुन्हे, हिंसा तसेच सामाजिक असमानता, वातावरण बदलाबाबत चिंता असल्याचे स्पष्ट केले.

जागतिक पातळीवर एकूणच लोकांना भेडसावणाऱ्या चिंतेचे विषय जाणून घेण्याच्या दृष्टीने याबाबतचे सर्वेक्षण ‘इप्सॉस’ने केले. भारताबाबत आणि तेही शहरी भागातील बेरोजगाराविषयी चिंता व्यक्त करणाऱ्यांचे प्रमाण ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात वाढल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

जगभरात सर्वाधिक नोकरकपात बँकांमध्ये!

जगभरात २०१९ सालात झालेल्या नोकरकपातीमध्ये बँकांमधील कर्मचाऱ्यांवर बसलेला घाला अधिक असल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्या तसेच कामगार संघटनांकडून संकलित स्पष्ट झाले आहे. सुमारे ५० हून अधिक बँकांनी ७७,७८० कर्मचारी कमी केले असून, गेल्या चार वर्षांतील नोकरकपातीची सर्वाधिक संख्या आहे.