अमेरिकेतील पतमानांकन संस्था एस अ‍ॅण्ड पी ग्लोबल रेटिंगने बुधवारी चालू आर्थिक वर्षामध्ये भारताचा विकास दर हा अपेक्षेपेक्षा कमी राहील असं म्हटलं आहे. भारताचा जीडीपी म्हणजेच राष्ट्रीय सखल उत्पन्नामधील वाढीचा दर अपेक्षेपेक्षा कमी राहील असा  अंदाज एस अ‍ॅण्ड पीने व्यक्त केल्याचे वृत्त पीटीआयने दिलं आहे. करोनाची दुसरी लाट भारताच्या अर्थवाढीसाठी जोखमीची असेल आणि करोनाच्या या लाटेमुळे म्हणावा तसा आर्थिक विकास साधण्यामध्ये अडथळे येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मार्च महिन्यामध्ये याच संस्थेने भारतीय अर्थव्यस्थेची चाकं करोनाच्या संकटानंतर पुन्हा फिरु लागली असून सरकारने दिलेल्या प्रोत्साहनांमुळे आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताच्या जीडीपी वाढीचा दर ११ टक्के राहील असं म्हटलं होतं. मात्र आता एस अ‍ॅण्ड पीनं ही वाढ ११ ऐवजी ९.८ टक्के इतकी राहील असं म्हटलं आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देणाऱ्या भारतासाठी ही चिंतेची बाब आहे.

एस अ‍ॅण्ड पीने यावेळी भारताचं रेटिंग स्थिर दृष्टीकोनाच्या हिशोबाने बीबीबी असं निश्चित केलं आहे. भारताच्या क्रेडिट रेटिंगचं पतमानांकन हे भारतीय अर्थव्यवस्थेत येणाऱ्या आर्थिक मंदीवर अवलंबून असेल असं सांगण्यात आलं आहे. भारत सरकारची आर्थिक परिस्थिती फार बिकट असून आर्थिक वर्ष २०२१ मध्ये सर्वसाधारण सरकारी तोटा हा जीडीपीच्या १४ टक्के असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. एस अ‍ॅण्ड पीचे आशिया-पॅसिफिक विभागाचे मुख्य अर्थतज्ज्ञ शॉन रोशे यांनी भारतात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आम्हाला जीडीपी वाढीसंदर्भातील आमचा अधीचा अंदाज बदलून त्यामध्ये घट करावी लागली, असं स्पष्ट केलं आहे.

अमेरिकन ब्रोकरेज फर्म असणाऱ्या गोल्डमॅन सॅक्सनेही करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्य आणि शहरांमध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन तसेच निर्बंधांच्या पार्श्वभीूमीवर भारताच्या जीडीपी वृद्धींच्या अंदजित टक्केवारी कमी केली आहे. आधी ११.७ टक्के वृद्धी होईल असं सांगणाऱ्या गोल्डमॅन सॅक्सने आता भारताच्या जीडीपीची वाढ ११.१ टक्क्यांनी होईल असं म्हटलं आहे. भारतातील लॉकडाउनचा परिणाम मागील वर्षीपेक्षा यंदा कमी आहे. तरीसुद्धा भारतातील प्रमुख शहरांमध्ये याचा होणारा आर्थिक परिणाम स्पष्टपणे दिसून येत असल्याचं संसेथनं आपलं अहवालात म्हटलं होतं. शहरामध्ये कठोर लॉकडाउन लावल्याने त्याचा परिणाम सेवा देणाऱ्या कंपन्यांवर आणि उद्योगांवर पडतो.

‘मूडीज’नेही व्यक्त केली चिंता

करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये साथीचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध हे देशाच्या अर्थिक विकासाला खीळ घालणारे असतील. यामुळे भारताच्या अर्थवाढीसाठी अडथळे निर्माण होती अशी भीती यापूर्वीच अमेरिकी पतमानांकन संस्था ‘मूडीज’ने व्यक्त केलीय. २०२१-२२ आर्थिक वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था दुहेरी अंकातील विकास दर नोंदवले, असा आशावादही ‘मूडीज’ने कायम ठेवला आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताचा विकास दर १३.७ टक्के असेल, असे ‘मूडीज’ने म्हटले आहे. मार्च २०२१ ला समाप्त वित्त वर्षांत देशाचा उणे (-) ८ टक्के अर्थप्रवास राहिला आहे.

भारतातील दुसऱ्या करोना  लाटेवर नियंत्रण म्हणून देशव्यापी लॉकडाउन लागू करण्याऐवजी केवळ बाधित क्षेत्रांवर सूक्ष्म रूपात लक्ष दिले जायला हवे. करोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण भारतात तुलनेत कमी असल्याचे निरीक्षण नोंदवत ‘मूडीज’ने याचे श्रेय लोकसंख्येतील मोठय़ा प्रमाणातील तरुणांच्या प्रमाणाला दिले आहे. भारतात अधिकाधिक लोकसंख्या लसीकरणाच्या कक्षेत यायला हवी, असंही ‘मूडीज’ने आपल्या अहवालात म्हटलं आहे.