राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर संभाव्य बँकांची नावे समोर येत असल्याचा परिणाम भांडवली बाजारात सलग दुसऱ्या दिवशीही दिसला. सार्वजनिक बँक निर्देशांकासह प्रमुख राष्ट्रीयीकृत बँकांच्या समभाग मूल्यात बुधवारी लक्षणीय वाढ नोंदली गेली.

राष्ट्रीयीकृत दोन बँकांसह एका सर्वसाधारण विमा कंपनीतील सरकारी हिस्सा कमी करण्याची घोषणा अर्थसंकल्प दरम्यान करण्यात आली होती. सरकारी अधिकाऱ्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने ‘रॉयटर्स’ने बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया व इंडियन ओव्हरसीज बँक यांच्यापैकी दोनचे खासगीकरण होणार असल्याचे वृत्त मंगळवारी झळकले.

परिणामी, भांडवली बाजारात संबंधित चार सरकारी बँकांसह सूचिबद्ध अन्य राष्र्ट्ीयीकृत बँकांचे मूल्यही सलग दुसऱ्या सत्रात वाढले. मुंबई शेअर बाजारातील पीएसयू बँक निर्देशांक बुधवारी ६ टक्क्य़ांनी झेपावला. तर चर्चेतील बँक समभागांचे मूल्य गेल्या दोन व्यवहारात मिळून ४० टक्क्य़ांपर्यंत वाढले आहे. तसेच स्टेट बँक, पीएनबी, बँक ऑफ बडोदाही टक्क्य़ांमध्ये एक आकडी अंकाने वाढले.

निफ्टी पीएसबी निर्देशांक : २,४५०.९० (+५.८६%)

बँक ऑफ इंडिया रु. ८४.७० (+१९.९७%)

बँक ऑफ महाराष्ट्र   रु. २२.८५ (+३.८०)

सेंट्रल बँक ऑफ इंडिया   रु. २०.०० (+३.३०%)

इंडियन ओव्हरसीज बँक रु.१५.७० (+२.६०%)