वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये ३० टक्के घसरण

मुंबई : करोना साथ प्रसार आणि परिणामी देशव्यापी टाळेबंदीमुळे गेल्या आर्थिक वर्षांत देशातील वाहन नोंदणी मोठय़ा प्रमाणात रोडावली आहे. गेल्या आठ वर्षांतील याबाबतची सुमार कामगिरी नोंदवताना जवळपास सर्वच गटातील वाहनांची विक्री वार्षिक तुलनेत लक्षणीय कमी झाली आहे.

नुकत्याच संपलेल्या २०२०-२१ आर्थिक वर्षांत देशातील एकूण वाहन नोंदणी १.५२ कोटी झाली आहे. आधीच्या वित्त वर्षांत ती २.१७ कोटी होती. वाहन वितरकांच्या संघटनेच्या दाव्यानुसार यंदा ती २०१२-१३ नंतर प्रथमच मोठय़ा प्रमाणात घसरली आहे.

गेल्या वित्त वर्षांत अनेक कंपन्यांनी वाहन उत्पादन कमी केले होते. तसेच वितरकांनीही मागणीअभावी कमी वाहनांची मागणी निर्मिती कंपन्यांकडून नोंदवली होती. अशाच वातावरणात गुढीपाडवा, दसरा तसेच दिवाळीलाही खरेदीदारांचा निरुत्साह होता.

वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये ट्रॅक्टर वगळता दुचाकी (-३१.५१ टक्के), तीन चाकी (-६४.१२ टक्के), वाणिज्यिक वापरासाठीची वाहने (-४९.०५ टक्के) तसेच कार, व्हॅन आदी प्रवासी वाहने (-१३.९६ टक्के) यांच्यासाठीची नोंदणी कमी झाली आहे.

गेल्या आर्थिक वर्षांत २३,८६,३१६ प्रवासी वाहनांची नोंदणी झाली. आधीच्या वर्षांतील २७,७३,५१४ वाहनांच्या तुलनेत त्यातील घसरण १३.९६ टक्के आहे. तर दुचाकीमध्ये ३१.५१ टक्के घसरण होऊन गेल्या वर्षांत त्यांची नोंदणी १,१५,३३,३३६ झाली. वर्षभरापूर्वी ती १,६८,३८,९६५ होती.

२०२०-२१ मध्ये तीन चाकी वाहनांची नोंदणी ६४.१२ टक्क्य़ांनी घसरून २.५८ लाख झाली. वर्षभरापूर्वी ती तब्बल ७.१९ लाख होती. तर व्यापारी वाहनांची वार्षिक तुलनेत जवळपास निम्म्यावर येत ४.४८ लाख नोंद झाली. ट्रॅकटरची नोंद मात्र १६.११ टक्क्य़ांनी वाढून ६.४४ लाख झाली आहे. २०१९-२० मध्ये ५.५५ लाख ट्रॅक्टर विक्रीची नोंद होती.

टाळेबंदी लागू झाल्यानंतरच्या पहिल्या महिन्यात, एप्रिल २०२० मध्ये एकही वाहन विकल्याची नोंद नव्हती. तर यंदाच्या एप्रिलमध्ये ११.८५ लाख वाहन नोंदणी झाली. आधीच्या महिन्यात, मार्च २०२१ मधील १६.४८ लाख वाहनांच्या तुलनेत त्यात यंदा २८.१५ टक्के घसरण नोंदली गेल्याचे वाहन वितरकांच्या संघटनेने म्हटले आहे.

यंदाच्या एप्रिलमध्ये प्रवासी वाहन विक्रीही कमी झाली असून दुचाकी विक्रीही रोडावली आहे. व्यापारी वापरासाठीच्या वाहनांमध्येही यंदा घसरण नोंदली गेली आहे. करोना साथ प्रसाराच्या दुसऱ्या लाटेत देशातील वाहन उद्योग अधिक अडचणीत सापडल्याचे ‘फाडा’चे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी म्हटले आहे.

करोना साथ प्रसाराचा शहरी तसेच ग्रामीण भागातील वाढता परिणाम पाहता प्रवासी तसेच अन्य वाहनांच्या नजीकच्या कालावधीतील विक्रीबाबतचीह प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे ते म्हणाले.